* ८,५८० नळजोडण्या तोडल्या
* गतवर्षीपेक्षा १४ कोटी अधिक पाणीपट्टी वसूल
ठाणे : पाणीपट्टी थकवणाऱ्या थकबाकीदारांवर पाणी पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल १४ कोटींची पाणीपट्टी वसुली अधिक झाली आहे. केवळ वसुलीचा आकडा न वाढवता वर्षभरात जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या.
शहरातील सुशोभीकरणासोबतच पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीवरही विशेष भर दिला आहे. यासाठी उपनगर अभियंता विनोद पवार आणि त्यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवून पाणीपट्टी थकवणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परिणामी आतापर्यंत वसुलीच्या संदर्भात पिछाडीवर असलेला पाणीपुरवठा विभाग यावर्षी मात्र वसुलीबाबत आघाडीवर आला आहे.
वर्षभरात केलेल्या कारवाईत ८,५७१ नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या. त्यापैकी वागळे इस्टेट भागात सर्वाधिक २,८२० नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या. त्याखालोखाल कळवा भागात १,७२३, दिवा भागात १,३०३, मुंब्रा भागात १,१४५ नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.
थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पालिकेने नियमित पाणी देयकांच्या वसुलीवरही भर दिला होता. गेल्या वर्षभरात १३४ कोटी ४६ लाख ४३,७८४ रुपयांच्या पाणी देयकाची वसुली पालिका प्रशासनाने केली आहे. त्याआधीच्या वर्षात १२० कोटी ५ लाख ३२,८९६ रुपयांच्या पाणी देयकांची वसुली झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षात पाणी देयकांच्या वसुलीत १४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.