मदतीचा हात मागण्यासाठी सेना नेता मित्र-पक्षांकडे !

ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपात नाराजी

ठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात ताकद मोठी असताना या जागा शिंदे गटाकडे गेल्या आहेत. विशेषतः ठाण्याच्या जागेवरून ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये नाराजी उफाळून आली. दरम्यान महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तर केवळ पंतप्रधान मोदी यांच्यासाठी नाराजी दूर ठेवून कामाला लागल्याचे चित्र भाजपात दिसत आहे.

गेले अनेक दिवस ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाने मिळवण्यात यश मिळवले आहे. तर या दोन्ही ठिकाणी सर्वाधिक ताकद असतानाही त्या जागा गमवाव्या लागल्याने महायुतीचा धर्म पाळण्यात नेहमीच भाजपाचा बळी जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आली आहे.

ठाणे लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघ ठाणे, ऐरोली आणि बेलापूर भाजपच्या ताब्यात आहेत. येथे अनुक्रमे संजय केळकर, गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे ओवळे-माजिवडे आणि कोपरी-पाचपाखाडी हे दोन मतदारसंघ आहेत. येथे अनुक्रमे प्रताप सरनाईक आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडून गेले आहेत. तर मीरा-भाईंदर मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन या मूळच्या भाजपाच्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जास्त असतानाच महापालिकांमध्ये देखील भाजपची ताकद मोठी आहे.

नवी मुंबई महापालिकेत भाजपचे ५८, शिंदे गटाचे ३२ तर ठाकरे गटाचे आठ नगरसेवक आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेतही भाजपचे वर्चस्व असून ठाणे महापालिकेतही नगरसेवकांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची ताकद दोन गटात वाटली गेली असताना आणि आमदार नगरसेवकांची संख्या मोठी असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपा ठाम असतानाच कल्याण लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपने आग्रह धरला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवली या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अनुक्रमे कुमार आयलानी, गणपत गायकवाड आणि विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण हे तीन आमदार निवडून गेले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा एकमेव आमदार अंबरनाथ येथून बालाजी किणीकर निवडून आले आहेत. तर मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत.

कल्याण लोकसभेतून विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असताना किमान ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला पुन्हा मिळावा अशी अपेक्षा भाजपा कार्यकर्त्यांची होती, मात्र महायुतीत ठाणे देखील शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने ठाणे भाजपात प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्याचे तीव्र पडसाद ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरांत उमटले. या तिन्ही शहरांमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यांनी नवी मुंबईत गणेश नाईक यांची भेट घेतली. तर ठाण्यात भाजपा नेते आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजपची ताकद जास्त असताना हे दोन्ही मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आले नाहीत, यापैकी एक किंवा किमान ठाण्याची जागा भाजपाला मिळायला हवी होती. तसे न झाल्याने नाराजी असणे स्वाभाविक आहे. परंतु नरेंद्र मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी अबकी बार चार सौ पार हा भाजपाचा निर्धार आहे. त्यामुळे ही नाराजी दूर ठेवून महायुतीने दिलेला उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी आम्ही, आमचे कार्यकर्ते बांधील आहोत, अशी प्रतिक्रिया श्री.केळकर यांनी दिली.