मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
ठाणे: ठाणे शहरात हवाई (पॉड) टॅक्सीच्या माध्यमातून भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था सुरु होत आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेणे व सर्वेक्षण करण्याची परवानगी संबंधित संस्थेला ठाणे महापालिकेने दिली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या पुढे गेली आहे. राज्यात नागरिकांना सर्वाधिक वेग ठाणे शहरामध्ये आहे. सहाजिकच भविष्यात रस्ते वाहतूकीला अनेक मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई (पॉड) टॅक्सी चा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरेल. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून ठाणे शहरात मेट्रो मार्गीकेचे जाळे देखील विकसित होत आहे.वडाळा ते गायमुख पुढील वर्षी सुरू होणे प्रस्तावित आहे.
ठाणे शहरातील कापुरबावडी ते गायमुख परिसरात मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टीने हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय म्हणून सुलभ आणि सुरक्षित हवाई टॅक्सी ठाणे शहरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील वडोदरा येथे हवाई टॅक्सीचा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी गुजरात दौऱ्यात या प्रकल्पाची पाहणी केली. त्या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी अशाच प्रकारचा प्रयोग ठाणे व मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्याबाबत पुढाकार घेतला. न्यूट्रॉन ईव्ही मोबिलिटी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरात हवाई टॅक्सीच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे विहंग हिल्स परिसरातील ४० मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात यावा अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली आहे.
या प्रकल्पासाठी महापालिका अथवा शासनाचा एक रुपयाही खर्च होणार नाही. तसेच शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.