स्टेशन परिसर होणारा कोंडीमुक्त
बदलापूर: बदलापूरचा सॅटिसच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे बदलापूरकरांची स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होईल अशी अपेक्षा आहे.
आमदार किसन कथोरे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभाग एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग यांची महत्वपूर्ण बैठक विधान भवनात नुकतीच आयोजित केली होती.
या बैठकीत बदलापूर स्टेशन परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महानगर पालिकाच्या धर्तीवर बदलापूर स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार कथोरे यांनी दिली आहे. या बैठकीत बदलापूर स्टेशन परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महानगर पालिकाच्या धर्तीवर बदलापूर स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून पुढील दोन महिन्यात सॅटिस प्रकल्पाचा सविस्तर तांत्रिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद एमएमआरडीएमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले आहेत.
सॅटिस प्रकल्प अंतर्गत बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात बदलापूर पूर्व भागात गांधी चौक ते कात्रप नाल्यावरील ब्रिज तसेच पश्चिम भागातील सानेवाडी चौक ते साई कृपा हॉस्पिटलपर्यंत एलेवेटेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच बदलापूर पूर्व व पश्चिम दोन्ही भागात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. दोन्ही भागात शहर वाहतूक बस सेवेसाठी व रिक्षासाठी स्टॅन्ड तयार करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचा महत्वपूर्ण भाग म्हणून बेलवली दत्तचौक ते समर्थनगर बरेज रोड या रस्त्याला रेल्वे लाईनला समांतर उड्डाणपुलाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पाचा प्रकल्प आराखडा करण्याची व आवश्यक ते भूसंपादन करण्याची जबाबदारी नगरपरिषदेवर टाकण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर बदलापूर पश्चिमेकडील नागरिकांना अंबरनाथकडे जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत गांधीनगर येथे अस्तित्वातील जागेवर एसआरए प्रकल्प राबवून रहिवाश्यांची व्यवस्था केली जाणार आहे व एस टी स्टॅन्ड च्या उर्वरित आरक्षण भागावर पार्किंग, भाजी मंडई व मच्छी मार्केट करून नागरिकांना त्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकल्पांना तातडीने मान्यता दिली असून एमएमआरडीए व नगरविकास विभागाला याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या सचिवांना या बैठकीत दिले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेल्या आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव असीम गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हेसकर, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश गोडसे माजी नगरसेवक शरद तेली, संभाजी शिंदे, किरण भोईर, रमेश सोळसे, प्रशांत कुलकर्णी, किरण बावस्कर, कृष्णा शिंदे, डॉ मिलिंद धारवाडकर आदी उपस्थित होते.