मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
नवी मुंबई: कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत अंतरिम अधिसूचना तत्काळ काढण्यात यावी म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गावे सर्वपक्षीय विकास समितीसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर अंतिरीम अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कल्याणमधील १४ गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी येथील गावकऱ्यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करून १४ गावांच्या विकासाचा प्रश्न मांडला होता. विधानसभा अधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांच्या समावेशाचा प्रश्न आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची २४ मार्च २०२२ रोजी घोषणा केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने मागील वर्षी हरकती सूचनांकरीता १२ सप्टेंबर २०२२ रोजी अधिसूचना जाहीर केली होती. त्यावर एकही हरकत न आल्याने या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र यावर आजतागायत अंतरिम अधिसूचना न काढल्याने या गावांचा समावेश नवी मुंबईत अजून करण्यात आला नाही. परिणामी या गावांचा विकास अजूनही खुंटलेला आहे.
ही अंतरिम अधिसूचना तत्काळ काढण्यात यावी म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गावांतील सर्वपक्षीय विकास समितीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली. यावर अंतिरीम अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुखयमंत्र्यांनी दिले. त्यामुळे १४ गावांचा समावेश लवकरच नवी मुंबईत होणार आहे.
विकास कामांसाठी १४० कोटींचा निधी जाहीर
१४ गावे नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत अजूनही अंतरिम अधिसुचना न काढल्याने येथील विकासकामे ठप्प झाल्याचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अंतरिम अधिसुचना निघेपर्यंत या गावांच्या विकास कामांसाठी नगरविकास विभागातून ७० कोटी तसेच एमएमआरडीएच्या माध्यमातून ७० कोटी असा एकूण १४० कोटी रुपयांचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
१५ सप्टेंबरपर्यंत भंडार्ली डम्पिग बंद?
भंडार्ली डम्पिंगची मुदत संपल्यानंतरही ठाणे महानगरपालिका या ठिकाणी कचरा टाकत आहे. यातून निर्माण होणारी कचऱ्याची दुर्गंधी, त्यातून वाहणारे सांडपाणी यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे या भंडार्ली डम्पिंगमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलने केली आहेत. त्यामुळे हे डंपिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर येत्या १५ सप्टेंबरच्या आधी भंडार्ली येथील डंपींग बंद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.