* ठाणे-भाईंदरच्या पाणी व्यवस्थेवरील ताण कमी होणार
* पाण्यासाठी वन्यजीवांचे होणारे स्थलांतर थांबणार
ठाणे : येऊरमधील हुमायून बंधाऱ्यासह चार बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी संबंधित विभागास निर्देश दिले असून चेना नदीवरही संरक्षक भिंत बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे बंधारे मार्गी लागल्यास ठाणे शहराच्या पाणी व्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत पुढाकार घेऊन पाठपुरावा केला होता.
ओवळा -माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या दालनात आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका हद्दीतील हुमायून बंधाऱ्याची दुरूस्ती व येऊर येथील अन्य चार बंधारे तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील चेना नदीवर बंधारा बांधण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हे सर्व बंधारे बांधणे व हुमायून बंधाऱ्याची दुरूस्ती तसेच चेना नदीवर संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला मंजूरी देण्याचा निर्णय जलसंधारण मंत्री शकरराव गडाख यांनी घेतला.
या बंधाऱ्याच्या कामासाठी सर्वेक्षणाचे काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या या बंधाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत असून या बंधाऱ्यांच्या निर्मितीनंतर संजय गांधी राष्ष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राण्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी नागरी वस्तीमध्ये येण्याची गरज भासणार नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यासारखे प्राणी नागरी वस्तीत येतात, त्यामुळे स्वत:च्या जिवाला व नागरीकांच्या जिवाला देखील धोका निर्माण होत असतो किंवा अनेक वेळा हे बिबटे पाण्याच्या शोधासाठी रस्त्यावर आल्यामुळे भरधाव वाहनांच्या धडकेमुळे मृत्यु पावलेले आहेत. तसेच पावसाळ्यामध्ये चेना नदीतील पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे व भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे स्वच्छ पाणी खाडीमध्ये जात असल्याने या बंधाऱ्यांच्या निर्मितीनंतर किमान तीन एमएलडी पाणी ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरातील नागरीकांना मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
बंधाऱ्यांसाठी एकूण सात कोटी रूपये व संरक्षण भिंतीसाठी चार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जलसंधारण विभागाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न निकाली काढल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे मनापासून आभार मानले. लवकरात लवकर या कामाला सुरूवात करण्यासंदर्भात संबंधीतांना आदेश करण्याची विनंती केली.
या बैठकीला जलसंधारण विभागाचे अवर सचिव श्री. पाटील व सहसचिव श्री. दि.शा. प्रशाळे, तसेच सुनिल काळे,प्र.ज.अ. ठाणे, मि.अ.पालवे- उपअधिकारी ठाणे, निवेदिता पाटील- सहजिल्हा नियोजन अधिकारी, ठाणे, उदय चंद्रकांत ढगे-उपसंचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, श्री. प्रवीण खेडकर-नि.वा.अ. ठाणे, श्री. जोकार डी.एम-जिल्हा संधारण अधिकारी-लघुपाटबंधारे विभाग जि.प. ठाणे. हे उपस्थित होते.