उद्योग जगताच्या नकाशावर येणार कल्याणचे अंतार्ली गाव

‘महाहब’साठी ५०० कोटी रुपयांची मंजुरी

कल्याण: महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपयांची तत्वत: मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी मंत्रालयात याबाबत एक बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हा मोठा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून कल्याण येथे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात अनेक नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत. रस्ते काँक्रिटीकरण्याची कामे, ऐतिहासिक मंदिर परिसर सुशोभीकरण, भुयारी गटार, जल जीवन मिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आगरी कोळी वारकरी भवन यांसारखे अनेक प्रकल्प मतदारसंघात मार्गी लागत आहेत. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे रूप पालटत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे तसेच कल्याण या परिसरात मजबूत उदयोजकीय इको सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. भविष्यात महाराष्ट्रातील स्टार्टअपची संख्या वाढावी, तसेच उद्योजकांना एका छताखाली स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी पोषक वातावरण मिळावे ही ‘महाहब’ची मुख्य संकल्पना आहे. यासाठी उद्योग विभागासह कौशल्य, रोजगार उदयोजकता आणि नावीन्यता विभाग, माहिती- तंत्रज्ञान यांच्यासह इतर विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. ‘महाहब’मध्ये प्रामुख्याने उद्योग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याचे काम करण्यात येईल. ‘महाहब’ हे प्रामुख्याने स्टार्टअप सुरु करणारे उद्योजक, संशोधक, शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार यांना उपयोगी पडणार आहे.

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध मान्यता, आवश्यक बैठका, चर्चासत्र, परिषदा याचे आयोजन आणि समन्वय या ‘महाहब’मार्फत करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने फिनटेक, डेटा सेंटर्स, औषधी कंपन्या, वाहन उद्योग, उत्पादन यांचा समावेश असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन-नानौटिया, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्यासह ‘महाहब’चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.