पावसाच्या जोराने सज्जा कोसळला
सुरेश सोंडकर/ ठाणे: गेली सहा दशके ठाण्याची ओळख असलेला पारसिक डोंगरावरील नुतनच्या बंगल्याचा सज्जा मंगळवारी वारा आणि पावसाच्या जोराने कोसळला. ही बातमी कळताच जुन्या पिढीच्या काळजात धस्स झाले नसेल तरच नवल!
अभिनेत्री नूतन म्हणजे ठाणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय. तिच्याबद्दल नितांत प्रेम आणि अप्रूप. पारसिक डोंगरावरील तिच्या बंगल्याभोवती काही पिढ्यांच्या संवेदनाही गुंफल्या आहेत. या बंगल्याकडे एके काळी पर्यटनाचे स्थळ म्हणून पाहिले जायचे. अलिकडच्या काळात अनेक घटनांनी तो प्रकाशात येत होता. सज्जा कोसळल्याच्या घटनेनंतर ठाण्यातील जुन्या पिढीच्या आठवणी पुन्हा चाळवल्या गेल्या आहेत.
पारसिकच्या डोंगरावर १९०३ पर्यंत इंग्रज राजवटीतील कलेक्टर, इंग्रज अधिकारी, सार्जंट यांची घरे आणि घोड्यांच्या पागा होत्या. १९६५ साली नूतन यांचे पती रजनीश बहल यांनी येथे बंगला बांधला. ते नेव्हीमध्ये उच्च अधिकारी पदावर होते, त्यामुळे पारसिक डोंगराच्या निसर्गरम्य खाडी परिसराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बोटीवरील डेकची प्रतिकृती असलेला देखणा बंगला बांधून त्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घातली. त्यांच्यानंतर या बंगल्याचा ताबा नूतन यांच्याकडे आला. कर्करोगाने नूतन यांचे १९९१ साली निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अभिनेता मोहनिश बहल यांनी बंगल्याची सूत्रे हाती घेतली.
अगदी दुरूनही एखाद्या ठाणेकराला हा बंगला सहज नजरेस पडत असे. काही वर्षांपूर्वी बंगल्यातील चोरी आणि अन्य घटनांनी पुन्हा एकदा या बंगल्याने जुन्या आणि नवीन पिढीचे लक्ष वेधले होते. आज सज्जा कोसळल्याने या बंगल्याची उभी राहण्याची ताकद संपल्याची चाहूल लागली. आज-उद्या तो नष्ट होईलही, पण त्यानंतरही ‘इथे नूतनचा बंगला होता’ असा मोठेपणा पारसिकचा डोंगर मिरवणार यात वाद नाही.
नूतनचा बंगला ५८ वर्षांचा झाला आहे. ठाणे महापालिकेने तो धोकादायक म्हणून जाहीर केला आहे. तो लवकरच पाडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सज्जा कोसळल्याने ही चर्चा आणखी जोर धरू लागली आहे.