आव्हाडांचे खंदे समर्थक अजित पवार गटात दाखल

शरद पवार गटाला कळवा-खारीगावमध्ये खिंडार

ठाणे: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या दोन खंद्या समर्थकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने कळवा-खारीगाव भागात शरद पवार गटाला खिंडार पडले असून आणखी काही जण पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे कळते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार श्री.आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि माजी शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी या दोन खंद्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मुंबईत प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला उपस्थित होते. श्री. पवार आणि श्री.वाणी हे दोघेही श्री. आव्हाड यांच्यासाठी जीव देण्यास देखिल तयार असणारे कार्यकर्ते होते. ठाणे महापालिकेच्या एका प्रकरणात त्यांनी नेतृत्व केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. खारीगाव भागात आ.आव्हाड यांच्या पक्षाचे काम श्री. पवार बघत होते तर खोपट भागात श्री. वाणी यांचे कार्य आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग त्यांच्या पाठीशी आहे. या दोघांनी आ.आव्हाड यांची साथ सोडल्याने राष्ट्रवादीचे नुकसान होत असल्याची चर्चा आहे. या दोघांवर तडीपारीची तसेच मोक्काची कारवाई करण्याची भीती घातल्यामुळे त्यांनी आ. आव्हाड यांची साथ सोडली अशी चर्चा सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरु आहे.

अभिजीत पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते… तू कुठे आहेस… आपण बसू… मार्ग काढू… अरे आता कधी मार्ग काढणार… अगोदर काय गोट्या खेळत होतात का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला.

या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदी उपस्थित होते.