सरकारी खजिन्याविना विकास करणाऱ्या अहिल्यादेवी!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड. रुचिका होळकर-शिंदे यांनी जागवल्या आठवणी
कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन

ठाणे: समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर न करता १५ कोटींच्या मालकिण असलेल्या अहिल्याबाईंनी आपला खासगी खजिना रिता केला. असा आदर्श राज्याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या. अशा आठवणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड. रुचिका होळकर-शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या.

कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प बुधवारी त्यांनी गुंफले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचे स्थान असलेली ३९ वी कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला दि ८ ते १४ जानेवारी रोजी नौपाड्यातील सरस्वती क्रिडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवारी माजी मंत्री, भाजपचे प्रदेश प्रभारी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ.संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, सचिव शरद पुरोहीत उपस्थित होते. तर, श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, संदीप लेले, प्रतिभा मढवी, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, डॉ. राजेश मढवी, मकरंद मुळे, टीजेएसबीचे राजाभाऊ दाते, विद्याधर वैशंपायन, प्रा.किर्ती आगाशे, संजीव ब्रम्हे, समतोलचे विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यादेवींचा जीवन इतिहास उलगडताना, ॲड. रुचिका होळकर-शिंदे यांनी, साध्या वाड्यातून बालवयात होळकर घराण्याची पुत्रवधु बनल्यानंतर वयाच्या विशीपर्यंत विविध विद्या, ज्ञान आणि भूगोलाच्या शिक्षणासह घोडदौड व शस्त्रविद्येत कशा पारंगत झाल्या, ते विषद केले. त्यांनी सरकारी खजिन्याचा वापर न करता स्वमालकीच्या १५ कोटींच्या धनदौलतीतून देवळे, घाट बांधले, पुष्कळ दानधर्म, जमिनी, गावे इनाम दिली. सर्वधर्मसमभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची समाजकारणाला जोड देऊन एक नवा आदर्श प्रस्थापित करीत त्यांनी समर्पित लोककल्याणकारी राज्यकारभार केला. अशा शब्दात ॲड. होळकर-शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा वेध घेतला.

प्रारंभी सचिव पुरोहित यांनी, नियोजित वक्ते अहिल्याबाईंचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे कार्यबाहुल्यामुळे अनुपस्थित राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तर कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे हे ३९ वे वर्ष असल्याचे प्रास्तविकात नमुद करून आ. संजय केळकर यांनी, त्यांच्या अध्यक्षतेखाली अखंडीत सुरु असलेल्या ह्या सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेत अनेक आठवणी वृद्धींगत केल्या.

कार्यकर्ता असताना व्याख्यानमालेला श्रोता म्हणुन यायचो-आ. रविंद्र चव्हाण

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता असताना या व्याख्यानमालेला श्रोता म्हणुन यायचो आणि आज थेट व्यासपीठावर आलो आहे, अशी आठवण जागवुन भाजप प्रदेश प्रभारी आ. रविंद्र चव्हाण यांनी, आ. केळकर हे द्रष्टे नेते असल्यामुळेच त्यांनी मला उद्घाटक म्हणुन बोलावल्याचे सांगितले. रामभाऊ म्हाळगी हे एक वेगळेच व्यक्तीमत्व होते. धोरण राबविण्याची क्षमता निर्माण करणारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे. ५० वर्षे आधी त्यांनी सरकारने हे करावे, ते करावे असे न म्हणता विविध उपक्रमांमध्ये सरकारने गुंतवणुक करावी, असे सुचविणारे रामभाऊ म्हाळगी होते. तेव्हा, त्यांच्या नावाने सुरू असलेल्या समाजकारणाचे प्रबोधन करणाऱ्या अशा व्याख्यानमालेला युवावर्गाने येणे गरजेचे आहे. किंबहुना, येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलली पाहीजे, असे स्पष्ट करीत आ. रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांकडून देखील अपेक्षा असल्याचे सांगितले.