पाच दिवसांनी खाडीतून काढला लहान मुलाचा मृतदेह

ठाणे: सायकल चालवताना खाडीत पडलेल्या लहान मुलाचा मृतदेह अखेर पाच दिवसांनी विटावा-ऐरोली खाडीदरम्यान आढळून आला.

१३ जुलै २०२२ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार दादाजी कोंडदेव स्टेडियम जवळ, नागसेन नगर, क्रीक रोड, ठाणे(प.) येथे रीशी उस्वा (७), राहणार नागसेन नगर, खारटन रोड हा मुलगा खाडी शेजारी असलेल्या घरावर सायकल चालवत असताना तोल जाऊन कळवा खाडीमध्ये पडला होता. घटनास्थळी ठाणे नगर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान १-रेस्क्यू वाहन, १-बाईक ॲम्बुलन्ससह, १- शववाहिकेसह उपस्थित होते.

सदर ठिकाणी विटावा खाडी, ऐरोली खाडीमध्ये मागील सहा दिवसांपासून स्थानिक मच्छिमार राजेश खारकर यांच्या टीमसोबत ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मार्फत ३-बोटींच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.

अखेर आज १८ जुलै रोजी सायंकाळी ५.४०च्या सुमारास विटावा ते ऐरोली खाडीच्या दरम्यान मुलाचा मृतदेह सापडला.

स्थानिक मच्छिमार राजेश खारकर यांची टीम,अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मदतीने सदर मुलाचा मृतदेह खाडीतून बाहेर काढून ठाणे नगर पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृतदेह ठाणे नगर पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात ठाणे येथे पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला आहे.