ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार
ठाणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयार भाजपा करत असल्याने शिवसेनेनेही ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणुका महायुतीत लढल्या जाणार की नाही याबाबत सध्या चित्र स्पष्ट होत नसले तरी भाजप-शिवसेनेत या निमित्ताने संघर्षाची ठिणगी आतापासूनच पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, तसेच विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक काल पार पडली. ही बैठक केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिचे रूपांतर एका भव्य मेळाव्यात झाले.
या बैठकीत प्रभाग, विभाग, वॉर्ड आणि शाखा पातळीवर संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यावर भर देण्याबाबत, शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवून, पक्षाचा विस्तार आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली. कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत जाऊन शिवसेनेच्या कार्याची माहिती द्यावी, त्यांना पक्षात सामावून घेण्याचा आणि घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचे निर्देश शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खा.नरेश म्हस्के यांनी दिले.
कै.आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा वारसा चालवणारे आणि ठाण्याचा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे, अनेक लोकोपयोगी योजना व कामे करण्यात आली आहेत. या सर्व कामांची माहिती अधिकाधिक ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याची आणि 24 तास जनसेवेत कार्यरत राहून लोकांच्या मनात शिवसेनेची ताकद आणखी दृढ करण्याची जबाबदारी यावेळी पदाधिकारी यांना देण्यात आली.
त्याचबरोबर यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपला जबाबदारीचा प्रभाग व्यवस्थित सांभाळावा, आणि ज्या व्यक्तींना पक्षासाठी वेळ देणे शक्य नाही, त्यांनी इतर सक्षम कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी सूचनाही यावेळी देण्यात आली. एकसंघ आणि दृढ संघटनशक्तीच्या जोरावर शिवसेना पुन्हा ठाणे महानगरपालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला खा नरेश म्हस्के,महिला आघाडी ठाणे जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, ठाणे महापालिका शहर संघटक अशोक वैती, ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, कोपरी पाचपाखाडी ठाणे शहर प्रमुख राम रेपाळे, दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी तसेच एकनाथ भोईर, मनोज शिंदे, विलास जोशी, राजेंद्र साप्ते, या मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत, ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्याचा निर्धार केला आणि ठाणे पुन्हा एकदा शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली प्रगतीच्या वाटेवर पुढे जाईल,असा विश्वास व्यक्त केला.