रायलादेवी येथे गणेश मूर्ती विसर्जन, छट पूजेसाठी पुरेशी व्यवस्था

रायलादेवी तलाव सुशोभीकरण कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

ठाणे : रायलादेवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जन आणि छट पूजा यांच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे. या तलावाच्या सुशोभिकरणाचे काम एमएमआरडीएमार्फत केले जात आहे.

या कामाची पाहणी बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव आणि एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी केली.

तलावाच्या सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू आहे. अँफी थिएटर, तसेच एका बाजूच्या पायवाटेचे काम झाले आहे. या कामाची पाहणी केल्यानंतर, गणेश मूर्ती विसर्जन तसेच छट पूजा यांच्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना महानगर आयुक्त मुदगल यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

याप्रसंगी, महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर आदी उपस्थित होते.