सेवा रस्त्यांवरील उभ्या वाहनांवर होणार कारवाई

अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांचे आदेश

ठाणे : शहरातील सेवा रस्त्यांच्या दुतर्फा लागणाऱ्या शोरुमच्या वाहनांमुळे आणि गॅरेजेस रस्त्यावर थाटल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. या वाहनांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध भागात फुटपाथ बांधले आहेत. सेवा रस्ते लहान-मोठ्या वाहनांसाठी सुरु केले आहेत. परंतु शहरात सध्या दुचाकीचे गॅरेजवाले, सेकंडहँड गाड्यांची विक्री करणाऱ्यांनी हे फुटपाथ आणि सेवा रस्ते व्यापले आहेत. त्यातही शहरात पडलेले खड्डे आणि मेट्रोची कामे सुरु असल्याने आधीच वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. त्यात पालिकेने बांधलेल्या फुटपाथवर, सेवा रस्त्यांवर या दुचाकीवाल्यांनी गॅरेज थाटले आहेत. तिथेच गाड्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. तिनहात नाक्यापासून ते घोडबंदरपर्यंत असलेल्या सेवा रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केलेली दिसतात. तसेच येथे वाहनांचे शोरुम असून त्यांच्याकडील नवी, जुनी वाहने देखील याच ठिकाणी पार्क केलेली असतात. परंतु आता मागील चार दिवस सुरु असलेल्या वाहतुक कोंडीचा फटका देखील या सेवा रस्त्यांना बसल्याचे दिसून आले. दुतर्फा लागलेल्या वाहनांमुळे या सेवा रस्त्यांवर देखील वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे किमान सेवा रस्ते तरी वाहतुकीसाठी मोकळे ठेवा अशी माफक ठाणेकरांनी आणि वाहन चालकांनी केली आहे.
दरम्यान ठाणे महापालिकेने काही वर्षापूर्वी सेवा रस्ते मोकळे करण्यासाठी पावले उचलली होती. वाहतुक पोलिसांना मदतीला घेऊन हे सेवा रस्ते मोकळे करण्यात आले होते. परंतु पुन्हा हे रस्ते व्यापले गेल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार येथील सेवा रस्ते, फुटपाथ अडविणा:यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले आहेत. यासाठी सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी पोलिसांशी समन्वय साधून ही कारवाई करावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.