३२ विकास आराखडे तयार
भाईंदर : महानगरपालिका क्षेत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या मोडकळीस आलेल्या, अनधिकृत, धोकादायक आणि राहण्यास योग्य नसलेल्या इमारतींचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. त्यासाठी समूह विकासयोजना महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात समूह विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता महत्वाचे तीन टप्पे आहेत. या प्रकरणी सल्लागारामार्फत महापालिकेशी सल्लामसलत करून मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३२ समूह विकास योजना आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. हे आराखडे अंतिम करून राजपत्रात प्रसिध्द करण्यात येतील. एकूण ३२ समुह विकास योजनेअंतर्गत महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण ६१९.७९ हेक्टर क्षेत्रास त्याचा फायदा होणार आहे. जवळपास १५०० एकर जमिनीवर ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना काशीमीरा उत्तनपर्यंत राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अधिकृत इमारतींना सहभागी होणे बंधनकारक नाही. अनधिकृत चाळी इमारती यांना योजनेत सहभागी होणे बंधनकारक आहे. परंतु सर्वेक्षण झालेल्या इमारतींना योजनेस सहभागी व्हायचे असेल तर होऊ शकतात. इमारतीमधील ५२ टक्के नागरिकांनी त्याचा विकासक निवडायचा असेल तर सहमती दर्शवणे आवश्यक आहे. या योजनेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्तांतर्फे प्रसिध्दी माध्यमांना देण्यात आली.