‘मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखाली २०२६ पर्यंत नक्षलवाद संपणार’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली येथे २७ नक्षलवादांचा खात्मा करण्यात आला. यात, केशवराव उर्फ बसवराजू या कुख्यात नक्षलवाद्याचा समावेश होता. त्यामुळे देशातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला जात असून २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या नेतृत्वाखाली संपेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

छत्तीसगडमध्ये यापूर्वी नक्षलवाद्यांना मारण्याचे काम, नक्षलवाद्यांना संपवण्याचे काम किंवा नक्षलवाद एन्काऊंटर करण्याचे काम कधी झाले नव्हते. परंतु, भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्याठिकाणी लक्ष घातले. आता दररोज नक्षलवादी मारले जातात. सशस्त्र पोलीस दल नक्षलवाद्यांचा खात्मा करत आहे. ही मोहीम देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होत असून त्यांनी घोषणा केली आहे की, २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवला जाईल. ही मोहीम नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पहलगाममध्ये लाडक्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचे पाप दहशतवाद्यांनी केले होते. त्याला जशास तसे ठोस उत्तर आणि धडा शिकवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. दहशतवादी आणि पाकिस्तान विरोधात मोदींनी कारवाईचा जो धडाका लावला आहे ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे, असे शिंदे म्हणाले.

खासदारांच्या दौऱ्याची टिंगल करणे हा खेदजनक प्रकार
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अबूधाबीमधील दौऱ्यावर विरोधक टीका करत आहेत. परंतु, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बोलणे झाले असून त्यांच्या बोलण्यात सकारात्मकता दिसून आली. त्याठिकाणच्या स्थानिक लोकांनी तसेच त्यांच्या प्रमुख प्रतिनिधींनी भारताच्या कारवाईचे पूर्ण समर्थन केले आणि स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानला कोणताही पाठिंबा दिला जाणार नाही. हा केवळ भारताचा नाही, तर देशाच्या अस्मितेवर आणि मानवतेवर झालेला हल्ला आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ठाम भूमिका घेतली आहे, तिच्या पाठीशी विरोधकांनीही उभे राहणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, काही विरोधक या दौऱ्याची टिंगल करत आहेत, जे अत्यंत खेदजनक आहे. देशहिताच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.