उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकार
शहापूर : सद्यस्थितीत अंदाजे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेल्या शहापूर नगरपंचायतीला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्या अथक प्रयत्नाने ४० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होत आहे. या योजनेचा अंतरिम मंजूरी आदेश येत्या जून अखेरपर्यंत देण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी दिली.
सन २०११ च्या जनगणनेनुसार शहापूर नगरपंचायत हद्दीतील लोकसंख्या ११ हजार ६२३ इतकी होती. तथापि १३ वर्षांनंतर हीच लोकसंख्या २५ हजारांवर गेली असल्याचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी सांगितले. पूर्वी शहापूरात कमी लोकसंख्या असल्याने गोठेघर, चेरपोली व कळंभे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील काही नळधारकांना या पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सध्याच्या आकडेवारीनुसार शहापूर नगरपंचायत हद्दीतील सुमारे २५ हजाराच्यावरील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रतिक्षेत असून या योजनेमुळे शहापूरकरांची पाण्याची तहान भागवली जाणार आहे.
दरम्यान शहापूर नगरपंचायतीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याकरिता शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांच्या पुढाकाराने २२ मे २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृहात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत शहापूर नगरपंचायतीसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेस जून महिन्याच्या अखेरपर्यंत मंजूरी देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस नगरविकासचे अप्पर सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे, शहापूर नगरपंचायत मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख तथा शहापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय भगत, पाणी पुरवठा सभापती रणजीत भोईर, नगरसेवक आनंद झगडे, इंद्रजीत सूर्यराव, रुपेश कोंडे, अजिंक्य हुलवले, भूषण शेट्टी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. शहापूर नगरपंचायतची नवीन पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच शहापुरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यात येईल.
शहापूर नगरपंचायतीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येथील नागरिकांची मुबलक पाण्यावाचून कुचंबणा होत असते. ही समस्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकताच त्यांनी विशेष पुढाकार घेत ही योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानुषंगाने पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात मिटिंग घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे काम तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. (मारुती धिर्डे, जिल्हाप्रमुख शिवसेना ठाणे जिल्हा)