एक गंभीर जखमी, परिसरात खळबळ
ठाणे: टेंभी नाका येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चॉपरसारख्या दिसणाऱ्या हत्याराने हल्ला चढवला. या हल्ल्यात कोकाटे हे बचावले असून त्यांचे मित्र गजानन म्हात्रे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. सुधीर कोकाटे यांच्या तक्रारीवरून आफरीन खान, हानिफ आणि अन्य अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तक्रारदार कोकाटे, किशोर गायकर, जखमी गजानन म्हात्रे, प्रसाद कांबळे, मोरे व इतर जण टेंभीनाक्यावरील नवरात्र कार्यालयासमोर कामानिमित्त बसले होते. त्याचवेळी अचानक एक रिक्षा आणि दुचाकी येऊन तेथे थांबली. दुचाकीवरून उतरलेल्या आफरीन हिच्या सांगण्यावरून रिक्षांतून तोंडाला रुमाल बांधलेल्या दुकलीने चॉपरसारख्या दिसणाऱ्या हत्याराने हल्ला चढवला. या हल्ल्यात कोकाटे बचावले असून त्यांचे सहकारी म्हात्रे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.