नालेसफाईत हातसफाई; ठेकेदाराला १०टक्के दंड

भाईंदर: दरवर्षीप्रमाणे मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्वीच्या नालेसफाईचे काम २० एप्रिलपासून सुरू आहे. महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना पाहणी दौऱ्यात एमएमआरडीए रोड, घोडबंदर उघाडी, महाजनवाडी, पेणकरपाडा, सृष्टी परिसर, अयप्पा मंदिराजवळील नालेसफाईच्या कामात अपेक्षित गुणवत्ता व कार्यक्षमता दिसून आली नाही. यामुळे ठेकेदाराला १०टक्के दंड आकारण्याचे आदेश आयुक्तांनी दिला आहे.

शहरातील अनेक ठिकाणी साचलेला गाळ पूर्णपणे काढण्यात आलेला नसल्याचे, तसेच मशिनरीचा पुरेसा आणि प्रभावी वापर न झाल्याचे आयुक्त शर्मा यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आले. या त्रुटी आणि कार्यातील हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे आयुक्तांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून मे. आशापुरा कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेवर पहिल्या देयक रकमेतून थेट १०टक्के दंड आकारण्यात आला आहे. यासोबतच, भविष्यात अशा कामांमध्ये कोणतीही ढिलाई आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरातील नालेसफाई कामे ही फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात परिणामकारक आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असावी, हीच महानगरपालिकेची भूमिका आहे, असे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस प्राधान्य देऊन, पावसाळ्यापूर्वी सर्व नाले वेळेत आणि प्रभावीपणे स्वच्छ करण्यासाठी सज्ज असून, संबंधित विभागांना वेळेच्या चौकटीत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.