वेळूक कातकरीवाडी येथे बालविकास प्रकल्प विभागाची कारवाई
ठाणे: २० मे २०२५ रोजी शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरीवाडी येथे नियोजित असलेला बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या रोखण्यात आला. विशेष म्हणजे प्रशासनाच्या जनजागृतीमुळे बालविविवाहाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.
या कारवाईदरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरेश गावित (कसारा पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रतिनिधी दिपाली कांबळे, सेवा सामाजिक संस्थेचे सुरेखा विशे, पर्यवेक्षिका कसारा-१, तसेच मुख्य सेविका कविता जगताप (बीटकसारा १, प्रकल्प डोळखांब) यांनी संयुक्तरीत्या तत्काळ कारवाई करत बालविवाह थांबवला. विशेषतः मुख्य सेविका कविता जगताप यांनी प्रकरणाची माहिती मिळताच तत्परतेने प्रयत्न करून मोठ्या मेहनतीने हा बालविवाह थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
मागील वर्षी 2024मध्ये १८ बालविवाह प्रकरणे रोखण्यात आली तर यावर्षी 2025मध्ये आतापर्यंत सहा प्रकरणे यशस्वीरित्या रोखण्यात आली. ही आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यातील जनजागृती उपक्रम आणि प्रशासनाची तत्काळ कृती यामुळे बालविवाह प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या यशस्वी हस्तक्षेपाबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी संपूर्ण पथकाचे व विशेषतः कर्मचारी व संबंधित अधिकार्यांचे कौतुक करताना म्हटले की, “बालविवाहासारख्या सामाजिक संकटांवर प्रभावीपणे कारवाई करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. वेळेवर कृती करून एका बालिकेचे भविष्य वाचवणाऱ्या संपूर्ण पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
बालविकास विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व स्वयंसेवी संस्थांनी दाखवलेली एकात्मता आणि सजगता ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. जिल्हा परिषद, ठाणे मार्फत सहकार्य व जनजागृतीचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असून ग्रामस्थांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.