ठाण्यातील चर्चासत्रात अभ्यासकांचे मत
ठाणे: ठाणे शहरातील मध्यमवर्गीय रहिवाशांच्या फायद्यासाठी ‘स्वयंपुनर्विकास’ योजना निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असे मत `स्वयंपुनर्विकास’ योजनेवरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांनी सामंजस्याने व सामुहिक पद्धतीने प्रयत्न केल्यास, बिल्डरांचा फायदा होण्यापेक्षा आपल्या कुटुंबालाच घरासाठी जास्त जागा मिळेल, असा विश्वास चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
ठाणे शहरातील ३० ते ३५ वर्षांवरील जुन्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या ‘स्वयंपुनर्विकास’ या विषयावरील शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी, विश्वास सामाजिक संस्था यांच्या वतीने नौपाड्यातील गोखले मंगल कार्यालयात विशेष परिसंवादाचे आज आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ओएसडी यतीन नाईक, उदय दळवी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार हर्षद मोरे, ज्येष्ठ वास्तुविशारद विनायक सहस्रबुद्धे, स्वयंपुनर्विकासाचे अभ्यासक विद्याधर वैशंपायन, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (टीडीसीसी) उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद एम. भोईर, अधिकारी शरद काशिवले आदी सहभागी झाले होते.
या परिसंवादाला नौपाडा परिसरातील जुन्या इमारतींमधील २०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १९८० पूर्वी नागरिक एकत्र येऊन भूखंड घेऊन घर बांधत असत. बदलत्या काळात बंद झालेली सहकारी तत्वावर गृहनिर्माण करण्याची परंपरा आमदार व मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास संकल्पनेतून पुन्हा रोवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंपुनर्विकासाची कल्पना उचलून धरून २०१९ पासून आवश्यक शासननिर्णय जारी केले. मुंबईत सोसायट्यांचे पुनर्विकास प्रकल्प सुरू झाले असून, नौपाड्यासह ठाणे शहरातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी स्वयंपुनर्विकास योजनेची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी चर्चासत्र भरविले आहे, असे विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मुंबई बॅंकेने कर्ज दिलेले १५ पैकी ७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर ठाणे जिल्हा बॅंकेने सहा प्रकल्पांना १०.५० टक्के दराने कर्ज दिले असून, त्यात नौपाड्यातील बाळकृष्ण सोसायटी व आदर्श सहकारी सोसायटीचा समावेश आहे, अशी माहिती चर्चासत्रात देण्यात आली. त्यानंतर स्वयंपुनर्विकास योजनेतील तरतूदी, भेडसावणाऱ्या अडचणी, रहिवाशांचा झालेला लाभ आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
एखाद्या इमारतीचा पुनर्विकास बिल्डरांकडे दिल्यानंतर बिल्डर नफा कमवतो. पण रहिवाशांनी एकत्र आल्यास बिल्डरला मिळणारा नफा हा रहिवाशांना मोठ्या जागेच्या स्वरुपात मिळतो. बिल्डरकडून भाडे थकविल्याचीही तक्रार राहत नाही. रहिवाशांना वेळेवर भाडे मिळते. तर काम न करणाऱ्या कंत्राटदारांना टप्प्याटप्प्यानुसार पैसे मिळत असल्यामुळे काम रखडत नाही. तर रहिवाशी स्वत:चे घर बांधत असल्यामुळे वस्तूच्या दर्जातही तडजोड केली जात नाही, याकडे परिसंवादात लक्ष वेधले गेले. एकूण प्रकल्प रक्कमेच्या ३३ टक्के रक्कम ही आधी जमा करावी लागते. ती रहिवाशांना अतिरिक्त फ्लॅट विकून जमा करता येऊ शकते. त्यामुळे स्वयंपुनर्विकासात अडचणी नाहीत. पण प्रत्येक सोसायटीने आपल्या इमारतीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करून पाऊल टाकावे, असे आवाहन करण्यात आले.