पाण्यावाचून नवी मुंबईकरांचे प्रचंड हाल

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीसाठी १४ मे ते १५ मे असा २४ तासांचा शटडाऊन घेतला होता. दुपारी १२ नंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. मात्र दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्याने रात्री उशिरापर्यंत नाले कोरडे पडले होते. त्यामुळे ३० तासानंतरही नळाला पाणी न आल्याने पाण्याविना नवी मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवरील अग्रोली ब्रीजजवळ रेल्वे ट्रॅक शेजारी व चिखले गावाशेजारील ब्रीजखालील जलवाहीनीवर वारंवार पाणी गळती होत आहे. ही जल वाहिनी बदलण्याचे काम बुधवार १४ मे रोजी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावरून नवी मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवार १४ मे दुपारी १३ ते गुरुवार १५ मे दुपारी १२ असा २४ तास बंद ठेवण्यात आला होता.

महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात येत होते, परंतु सदर काम वेळेत पूर्ण झाले नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम पूर्ण होण्यास रात्री बारा वाजणार होते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत नळाला एक थेंबही पाणी नसल्याने नागरिकांची चांगली धावपळ झाली. अनेक सोसायट्यांना वापराच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागले. तसेच अनेकांना पिण्याच्या आणि स्वयंपाकाच्या पाण्यासाठी बिसलेरी पाण्याचा आधार घ्यावा लागला. परिणामी पाण्याविना नागरिकांचे हाल झाले.