खासदार नरेश म्हस्के यांची केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी
ठाणे : ‘ऑपरेशन सिंदूर’वर व भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाठा खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.
भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनले आहेत, अशी सडकून टीका खासदार म्हस्के यांनी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार म्हस्के म्हणाले की, गेले दोन दिवस भारतीय लष्कराच्या कारवाईवर संजय राऊत आणि अरविंद सावंत संशयास्पद परिस्थिती निर्माण करत आहेत. पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा राऊत आणि सावंत यांच्या तोंडून बाहेर पडत आहे. ‘गिरे तो भी टांग उपर’, हे कोणाला उद्देशून आहे, असा सवाल खासदार म्हस्के यांनी अरविंद सावंत यांना केला. भारताच्या हवाई दलाचे वैमानिक दक्ष असून आदेशाची वाट पाहत आहेत. ‘गिरे तो भी टांग उपर’ म्हणणे हा या वैमानिकांचा अपमान नाही का? अरविंद सावंत यांनी या वक्तव्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे, असा इशारा म्हस्के यांनी दिला. भारतीय लष्कर हे हिंदुस्थानचे लष्कर आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पाकिस्तानची भाषा काय बोलताय, अशा शब्दांत खासदार म्हस्के यांनी उबाठा खासदारांवर बोचरी टीका केली.
भारतीय लष्कराबाबत राऊत आणि सावंत यांनी केलेली वक्तव्यांचा प्रत्येक नागरिकाने तीव्र निषेध करायला हवा, असे ते म्हणाले. १९७१ साली भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यावेळी पाकिस्तानी वर्तमानपत्रात पाकिस्तान जिंकला, पाकिस्तान लष्कर जाहीर करत होते. या वर्तमानपत्राची प्रत खासदार म्हस्के यांनी यावेळी सादर केली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला होता. आजही पाकिस्तानी वर्तमानपत्रात पाकिस्तान जिंकला अशा बातम्या येत आहेत. मात्र विरोधकांनी १९७१ प्रमाणेच आज सरकारवर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास ठेवणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणार की भारतीय लष्करावर विश्वास ठेवणार असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला.
भारतीय सैन्य हे कोणा पक्षाचे नाही तर देशाचे सैन्य आहे. त्यामुळे लष्करावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. लष्कराने फोटोसकट, व्हिडिओ सकट पुरावे दिले तरी तुम्ही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवतात हा एकप्रकारे लष्कराचा अपमान असून तो देशद्रोह आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले.
आजची राऊत याची वक्तव्ये पाहता त्यांना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्तेपद किंवा पाकिस्तानातील एखाद्या वृत्तपत्राचे संपादक पद हवे असेल, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. मुंबईत २००६ मध्ये झालेले लोकल ट्रेनमधील बॉम्बस्फोट आणि २००८ मध्ये झालेला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी राऊत यांना इंदिरा गांधी यांची आठवण का नाही आली, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला. त्यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होते, मात्र कारभार सोनिया गांधी चालवत होत्या. त्यावेळी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक का नाही केला, असा प्रश्न राऊत हे सोनिया गांधी यांना विचारतील का, असे खासदार म्हस्के म्हणाले. भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय निर्माण करणे हे देशद्रोह आहे. राऊत आणि सावंत यांच्या वक्तव्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली.