महाबोधी विहारमुक्तीसाठी ठाण्यात बौद्ध भिख्खू-अनुयायांचा एल्गार

ठाणे: बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला.

बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्षे ब्राह्मणी व्यवस्थापन आहे. ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या, यासाठी देशभर भिक्खूसंघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत. त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला. ‘बुध्दम शरणम गच्छामी’ अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी ११ वाजता मोर्चास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप झाला आहे. या मोर्चात सुमारे तीन हजार लोक सहभागी झाले होते.

मोर्चा समितीच्या वतीने भदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्खूसंघ, नानासाहेब इंदिसे, भास्कर वाघमारे राजाभाऊ चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. बोधगया महाबोधी विहार 1949 चा कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा; बोध गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन, भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात द्यावे; बोधगया येथे उपोषण करीत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरीत थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, महेंद्र अनभोरे, प्रमोद इंगळे, रवींद्र गायकवाड, आनंद कापुरे, संदीप खरात, जयवंत बैले, श्रीकांत कांबळे, समाधान तायडे, अशोक कांबळे, बाबासाहेब येडेकर, तात्याराव झेंडे, जे. जी. यादव, सतीश कांबळे, राहुल घोडके, लोभसिंह राठोड, विशाल ढेंगळे, डॉ. प्रमोद जाधव, विमल सातपुते, सुमन इंगळे, दैवशाला हराळे आदींनी परिश्रम घेतले.