भिवंडी : भिवंडीत लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत असताना होळीच्या दिवशी मध्यरात्री राकाँपा अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईतील एका वृत्तवाहिनीने शहरात भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. त्या चर्चासत्रात राकाँपा अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रवीण पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केले. सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा राग प्रसाद पाटील यांच्या मनात होता. राकाँपा अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रवीण पाटील हे होळीच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास मनपा आयुक्त बंगल्याशेजारी असलेल्या न्यू शांती व्हील हाईट्स येथे बसले असताना शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष मनोज पाटील उर्फ प्रसाद हे तेथे आले आणि त्यांनी प्रवीण पाटील यांना शिवीगाळी केली. दुखापत करण्याच्या हेतूने दगड मारला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार शहर पोलीस ठाण्यात प्रवीण पाटील यांनी दिली. या घटनेने मानसरोवर परिसरात खळबळ माजली असून येत्या निवडणुकीत हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.