प्रजासत्ताक दिनानिमित्त ७५ मिनिटात केला मनमाडचा थम्सअप सुळका सर

कल्याण : येथील गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक एडवेंचर्स यांच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी अवघ्या ७५ मिनिटात सर करत देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करून देशाप्रती आदर व्यक्त केला. सोबतच देशाचे राष्ट्रगीत सुळक्यावर गाऊन एक अनोख्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 
थम्सअप सुळक्याची उंची 180 फूट आहे. मनमाड येथील कातरवाडी पासून सुळक्यापर्यंत ट्रेक करावा लागतो. सदर सुळक्याची चढाई अति अवघड श्रेणीत मोडत असल्याने सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी लागते. सुळक्याचा भूतकाळ पाहता मागील वर्षी तांत्रिक चुकीमुळे दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे या सुळक्यावर त्यापासून कोणीही चढाई केली नव्हती. पण देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याणच्या सुप्रसिद्ध सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संघाने ७५ मिनिटात या सुळक्यावर यशस्वी चढाई पूर्ण करत देशाप्रती अनोख्या पद्धतीने अभिवादन व्यक्त करण्यात आले. या मोहिमेत सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संस्थेचे दर्शन देशमुख, पवन घुगे, भूषण पवार ,संजय करे ,राहुल घुगे व प्रसिद्ध युट्युबर प्रशील अंबादे हे सामील होते.