ठाणे: बिहारमधील १५ वर्षांच्या मुलीला ठाण्यात आणून तिला पाच लाखांत विकण्याचा डाव ठाणे गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. पोलिसांनी वेषांतर करून वागळे इस्टेट परिसरात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक १६ येथे एका हॉटेलमध्ये पीडित मुलीचा सौदा करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अत्यंत शिताफीने हॉटेल भोवती सापळा रचून आरोपी श्रवणकुमार चौधरी (२६) याला रंगेहात पकडले आहे.
ही मुलगी बिहार येथे राहणारी असून तिला कामाला लावण्याच्या बहाण्याने थेट ठाण्यात आणले. येथे मुलीची पाच लाखांत विक्री करण्यात येणार होती. याबाबतची खात्रीलायक माहिती ठाणे गुन्हे अन्वेषन विभागाच्या वागळे इस्टेट युनिट ५ला मिळाली. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका बड्या हॉटेलमध्ये पीडित मुलीचा सौदा करण्यात येणार होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ जानेवारी रोजी युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने वेशभूषा बदलून डाव उधळून लावत आरोपी श्रवणकुमार चौधरी याला रंगेहात पकडले.
पुढील तपास सुरु असून पीडित मुलीची उल्हासनगर येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मुलीला तिच्या कुटंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी दिली.