दिवस टेनिस क्रिकेटचे!

स्वप्न जरी सचिन अथवा विराट होण्याचे असले तरी ते साकार होणार नसते आणि याची पूर्ण खात्री असली तरी क्रिकेटवर ‘एक्सपर्ट कॉमेन्ट’ करण्याचे किंवा गेला बाजार घरासमोरच्या गल्लीत या लोकप्रिय क्रीडा प्रकारातील आपले नैपुण्य तपासून बघण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही! सिझन बॉलने खेळण्यात जी जोखिम आहे ती टेनिस बॉलमध्ये नाही आणि त्यामुळे हा खेळ लोकप्रियतेच्या शिखरावरुन खाली उतरण्याचे नाव घेत नाही. नाही म्हणायला खो-खो आणि कबड्डी या देशी खेळांना उत्तेजन देण्यासाठी ‘कॉर्पोरेट विश्व’ पैशांच्या थैल्या घेऊन उतरले असले तरी क्रिकेटचे वेड कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. त्याची प्रचिती सध्या ठाणेकारांना येत असून गेल्या चार दिवसांपासून दादोजी कोंडदेव क्रीडागृहात रात्री प्रकाशझोतातले सामने रंगू लागले आहेत. निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजिब मुल्ला यांच्या वाढदिवसाचे असले तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई ते थेट पनवेल-कर्जतपर्यंतचे शेकडो खेळाडू आपले कसब दाखवण्यासाठी दररोज ठाण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे खेळाडू त्या-त्या भागात ‘लोकल हिरो’ असून त्यांच्या वाट्याला रोहित-रायडू-शमी-बुमरा यांच्यासारखी लोकप्रियता आहे आणि त्यांचे चाहते लांबलांबहून हे सामने पहाण्यासाठी येत आहेत. टेनिस क्रिकेटची जादू पहायची असेल तर दादोजी कोंडदेव क्रीडागृहाला भेट द्या!

दरवर्षी साधारणतः जानेवारी-फेेब्रुवारी महिन्यात टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धांना सुरुवात होत, असते. छोटी-छोटी हौशी मंडळे त्यासाठी सराव करु लागतात. ही तरुणाई आपल्या झेंड्याखाली होणार्‍या स्पर्धेत खेळावी याकरिता नेते उत्सुक असतात. त्यानिमित्ताने त्यांना जनतेसमोर येता येते. ‘इमेज बिल्डिंग’चा हेतू साध्य होताना पक्षसंघटनेची यंत्रणा बळकट होण्यास असे उपक्रम उपयुक्त ठरत असतात. थोडक्यात एका दगडात अनेक पक्षी मारले जातात आणि मग त्यासाठी हात थोडा सैल सुटला तरी नेत्याला हरकत नसते. टेनिस क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून राजकीय स्पर्धाही वाढीस लागत असते. हे बक्षिसांच्या रकमांवरून स्पष्ट होते.

श्री. नजिब मुल्ला हे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यासू नगरसेवक म्हणून सुपरिचित आहेत. त्या जोरावर ते विरोधी पक्षनेतेही झाले. नेता मोठा होत गेला की त्याच्याभोवती वाद सुरु होतात. श्री. मुल्ला यांच्याबाबतीत तसे झाले. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडताच अजित पवार गटात जाणे पसंत केले. एकेकाळी आ. जितेंद्र आव्हाड यांचे निकटचे सहकारी असणारे श्री. मुल्ला मुंब्रा-कळवा मतदारसंघातून निवडणूकीस उभे राहिले तर आश्चर्य वाटू नये. या टेनिस बॉल स्पर्धेला हा राजकीय आयामही आहे असो.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांना राजाश्रय मिळो अथवा न मिळो, त्या जनसामान्यांच्या मनात घर करु लागल्या आहेत. त्यातील खेळाडूंची कामगिरी नेत्रदीपक असते. मोठ्या क्रिकेट स्पर्धांचा त्यावर प्रभाव दिसतो. मुल्लांसारखे हौशी नेते अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन तिला मोठे स्वरुप प्राप्त करुन देतात, तेव्हा त्यामागे नक्कीच काही विचार असणार. तो काही असला तरी सर्वपक्षीय तरुणांना डिसेंबरपासून तीन महिने एक पर्वणीय लाभत असते.