रसायनशास्त्रात संशोधन करताना प्रयोगशाळेत दोन अथवा एकाच वेळी अनेक रसायनांना एकत्र आणून प्रयोग केले जात असतात. त्यामुळे होणाऱ्या ‘रिअॅक्शन’चा अभ्यास करुन त्यांची नोंद वैज्ञानिक करीत असतात. अर्थात त्यासाठी या तज्ज्ञांना मूळ रसायनांचे गुणधर्म माहीत असावे लागतात आणि जर ते त्यांना ठाऊक नसतील तरी प्रयोगाच्या नावाने भलतेच साहस केल्याचा अनुभव त्यांना येऊ शकतो. अशा फसलेल्या प्रयोगांमुळे जो अपेक्षित शोध लावण्याचा हेतू असतो तो फोल ठरत असतो. राजकारणात असे प्रयोग होत असतात आणि वेळोवेळी नेत्यांच्या ‘रिअॅक्शन’ या कशा निरर्थक असतात याचा अनुभव आपण घेत असतो. अवघ्या देशाची प्रयोगशाळा करणाऱ्या समस्त नेतेमंडळींना नेमका कशाचा शोध लावायचा असतो हे आपल्याला कळलेले नाही परंतु त्यांच्या सातत्याने फसणाऱ्या प्रयोगांमुळे देशाच्या एकात्मिकतेवर आणि जनतेच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होऊ लागला. मणिपूरचा ताजा घटनाक्रम पहाता विविध प्रकारच्या रिअॅक्शनचा सुकाळ सुरु आहे तर सत्तारुढ पक्षाची मौन-प्रतिक्रिया या फसलेल्या प्रयोगाची सुन्न करणारी अर्थशुन्यता चव्हाट्यावर आणत आहे.
मणिपूर प्रकरणावर, सध्याचा सत्तारुढ पक्ष विरोधी बाकांवर बसला असता तर, कशा प्रकारे रिअॅक्ट झाला असता हे सागंण्यासाठी फार सखोल राजकीय शहाणपण असण्याची गरज नाही. हे प्रकरण इतके गंभीर आहे की राजकीयदृष्टया त्याचा लाभ घेतला गेला असता, अगदी सत्तांतरही घडवून आणता आले असते. विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरु असताना योगायोगाने हे संतापजनक प्रकरण घडले आहे. त्याचा राजकीय लाभ घेणे हे हीनपणाचे लक्षण मानले तरी तो घेतला जाणार यात वाद नाही. देशभात भाजपाविरोधी राज्यांत मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरु झाली आहेत. त्यामुळे जनतेची सहानुभूती असलेल्या प्रकारणाला पाठिंबा देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होणार यात वाद नाही. भाजपा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणार. परंतु मणिपूर प्रकरणात जनतेला अपेक्षित प्रतिक्रिया कधी देणार हे मात्र सांगता येणार नाही.
विरोधी पक्ष सातत्याने पंतप्रधानांच्या ‘मौना’बद्दल तक्रार करीत असतो. त्याचे ते आता राजकीय भांडवल करु लागतील. जनतेला भाजपाची भूमिका विवादास्पद वाटू शकते. अगदी हिन्दूत्ववादी भाजपा-‘भक्त’ ही बुचकळ्यात पडल्याचे दिसत आहे. भाजपा नेमका कोणता ‘प्रयोग’ करु पहात आहे आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा त्यांना अंदाज नसावा, असे समजायचे काय? रासायनिक प्रयोगांमध्ये घटक रसायनांचे गुणधर्म माहित असावे लागतात, हे सुरुवातीलाच म्हटले आहे. जनतेचा 2014 आणि 2019 जो गुणधर्म होता तो ‘भाजपा’च्या गुणधर्माला सुसंगत होता. दहा वर्षांनी भोवतालचे हवामान त्या-त्या रसायनांवर प्रक्रिया करीत असतो. जनतेवर तशी प्रक्रिया झाली आहे आणि भाजपाने म्हणूनच ‘मौना’चे प्रयोग थांबवायला हवेत.
सरकार कोणाचेही असो. महिलांच्या वाट्याला इतकी हीन वागणूक येत असेल तर राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता सुस्पष्ट प्रतिक्रिया नोंदवायला हवी. एखादे रसायन किती तापवायचे, ते थंड व्हायला किती वेळ लागतो आदी निर्णय अभ्यासू संशोधक अनुभवाच्या जोरावर घेत असतो. भाजपातील असे संशोधक किती काळ अभ्यास करणार आहेत आणि नेमके कधी निर्णायक भूमिका घेणार आहे हे कळत नाही. ही संदिग्धता जनतेच्या मनातील गोंधळ वाढवत आहे.
राजकारणाचा दर्जा झपाट्याने खालावत चालला आहे. थिल्लरपणापासून गंभीर प्रकरणांकडे कानाडोळा करणे ही नेत्यांची ‘रिअॅक्शन’ बाबतची रेंज आहे. त्यातून जनतेची ‘रिअॅक्शन’ तयार होत असते, हे केंद्रीय प्रयोगशाळेतील वैज्ञानिक ओळखून नसतील असे नाही. पण ते भलत्याच फॉर्म्युल्याच्या शोधात आहेत, जो अशा प्रकारे गवसणे केवळ कठीण आहे. त्यांचा ‘केमिकल लोच्या’ झाला आहे असे म्हणावे लागेल.