घोडबंदरचा १०० टन कचरा तत्काळ निकाली काढणार!

आधुनिक पद्धतीने विघटन आणि खतनिर्मिती
ठाणे: ठाणे शहरातील कचरा आणि डंपिंग समस्या तीव्र होत आहे. त्यामुळे ज्या विभागात कचरा निर्माण होतो, तेथेच त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याचा विचार पुढे येत आहे. ठाणे महापालिकेने हिरानंदानी आणि मुंब्य्रातील कौसा येथे छोटे कचरा प्रकल्प उभारल्यानंतर कासारवडवली आणि गायमुख येथे दोन प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू केले आहे.
संपूर्ण घोडबंदर पट्ट्यातील कचर्‍याचे त्याच हद्दीत विघटन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कासारवडवली येथे ७५ टन आणि गायमुख येथे २५ टन कचर्‍यावर प्रक्रीया करणारे दोन केंद्र पालिका उभारणार आहे. विशेष म्हणजे उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परिसरात जमा होणार्‍या कचर्‍यातील ७० टक्के पाण्याचा अंश शोषून उर्वरित कचर्‍यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. संपूर्णपणे बंदिस्त आणि दुर्गंधीविरहित ही यंत्रणा आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदरची कचरा समस्या सुटणार असून महिला बचत गटांनाही उत्पन्नाचे साधन मिळणार आहे.
ठाणे महापलिका क्षेत्रामध्ये दररोज सुमारे एक हजार टन इतका कचरा जमा होतो. हा सर्व कचरा पूवीं दिव्यातील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. मात्र दिव्याचे डंपिंग बंद झाले असून तुर्तास हा कचरा भंडार्ली येथे टाकण्यात येत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून भंडार्लीमध्ये कचरा टाकण्यास विरोध होत आहे. दुसरीकडे डायघर कचरा प्रकल्प अजूनही रखडत चालला आहे. अशावेळी संपूर्ण पालिका हद्दीमध्ये छोटे छोटे कचरा विघटन प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
घोडबंदर मार्गावरील हिरानंदानी इस्टेट येथे ५० टन कचर्‍यावर प्रक्रीया करणारा प्रकल्प सुरू झाला आहे. तर मुंब्रा कौसा येथेही १० टन कचर्‍याचे विघटन होत आहे. त्यामुळे पालिकेने आता संपूर्ण घोडबंदर पट्टा कचरामुक्त करून तिथेच विघटन प्रकल्प राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शहरात जमा होणार्‍या एक हजार टनपैकी २०० टन कचरा हा घोडबंदर परिसरातील आहे. त्यापैकी ५० टन कचर्‍याचे सध्या हिरानंदानी येथे विघटन होत आहे. त्यामुळे उर्वरित १५० टन कचर्‍याचे विघटन करण्यासाठी पालिकेन कासारवडवली आणि गायमुखची निवड केली आहे.
कासारवडवली येथे ७० टन घनकचरा प्रकल्प आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात येणार आहे. तर गायमुख येथील २५ टन प्रकल्पाचा खर्च पालिका उचलणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या निविदा निघाल्या असून दिवाळीपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधी कचर्‍यातून पाणी वेगळे करणारा आणि उरलेल्या चोथ्यावर प्रक्रीया करून त्याची खतनिर्मिती करणार हा प्रकल्प आहे. या प्रक्रीयेनंतर तयार होणारे खत हे महिला बचत गटांना मोफत देण्यात येणार असल्याने त्यांनाही आर्थिक हातभार लागणार आहे.
जेव्हा सर्व प्रकारचा सेंद्रिय कचरा मशीन मध्ये टाकला जातो तेव्हा मशीनमध्ये बसवलेले आर्द्रता सेंसर कचर्‍यामधील आर्द्रता दर्शवतात. सर्वप्रथम कचर्‍याचे आठ ते पाच एम एम भागात तुकडे केले जातात. त्यानंतर त्यातील अतिरिक्त आर्द्रता प्रेसच्या साह्याने वेगळे केले जातात. अतिरिक्त पाणी हे जवळपास ३० टक्के ते ४० टक्के निघते जे ‘ईटीपी’मधून फिल्टर केले जाते व साफसफाईसाठी वापरले जाते. उर्वरित चोथा डिझास्टरमध्ये टाकला जातो. येथे असंख्य थरमोफेलिक जिवाणू त्याचे खतामध्ये रूपांतर करतात.
कोणत्याही प्रकारच्या सेंद्रिय कचर्‍यामध्ये ७० टक्के पाण्याचा अंश असतो व उरलेले ३० टक्के हा सेंद्रिय भाग असतो आणि हेच या प्रणालीचे मुख्य तत्व आहे. ही स्वयंचलित बायो कंपोस्टिंग मशीन असून यामध्ये थरमोफेलिक प्रकारचे खास जिवाणू वापरले जातात. जे सर्व प्रकारच्या कचर्‍याचे जैविक विघटन घडवून आणतात परिणाम स्वरूप कचर्‍याचे आकारमान ८० ते ८५ टक्के कमी होऊन सात ते नऊ दिवसांमध्ये त्याचे चांगल्या पोषणमूल्य असलेल्या मातीत रूपांतर होते.