ठाणे :शहरातील बहुतांश वृक्ष हे काँक्रीटमुक्त असल्याचा दावा न्यायालयात करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दाव्याची पोलखोल याचिकाकर्त्याने केली आहे. काँक्रीटच्या कचाट्यात सापडलेल्या काही वृक्षांची छायाचित्रेच त्यांनी न्यायालयात सादर करून पालिकेचा दावा खोटा पाडला आहे.
गेल्यावर्षी कोलबाड भागात वृक्ष पडून अर्पिता वालावलकर यांचा मृत्यु झाला तर, अमोल रांधावे हे जायबंदी झाले. या दोघांना आर्थिक मदत किंवा त्यांच्या वारसाला पालिकेत नोकरी मिळावी अशी मागणी त्यांच्या कुटूंबियांकडून होत होती. या संदर्भात अर्पिता यांचा मुलगा प्रतिक वालावकर आणि ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. प्रतिक यांना नोकरी तर, रांधावे यांच्या उपचाराचा आर्थिक खर्च देण्याच्या विनंती अर्जावर सकारात्मक विचार करण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाला देण्यात आली.
ठाण्यातील बहुतांश वृक्ष काँक्रिटमुक्त आहेत. तर, उर्वरित काँक्रिटच्या फासात अडकलेले वृक्षांचे परीक्षण करण्यात येत असल्याचेही महापालिकेकडून न्यायालयात सांगण्यात आले. यावर तीव्र आक्षेप नोंदवत काँक्रिटच्या वेढ्यातील वृक्षांची छायाचित्रे न्यायालयात सादर करताच, न्यायालयाने सात दिवसांत परीक्षण पूर्ण करून वस्तूस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेने २०२२ मध्ये वृक्षगणना केली. त्यानुसार संपुर्ण शहरात सात लाख २२ हजार इतके वृक्ष आहेत. त्यात ३० टक्के विदेशी तर, ७० टक्के देशी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरात वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अशा घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून मात्र ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. २०१५ पासून राष्ट्रीय हरित प्राधिकरण व अन्य न्यायालयांनी वृक्ष काँक्रिटमुक्त करण्याच्या वारंवार सूचना देऊनही ठाणे महापालिका त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत उदासीन आहे, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.