ठाणे : भर पावसात रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराचे काम करतांनाचा व्हिडीओ शनिवारी ठाण्यातील समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. पाऊस पडत असतांना गटारात खडी , रेती आणि सिमेंटचे मिश्रण टाकले जात होते. याची दखल ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून संबंधित ठेकेदाराला या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या ठाणे महापालिका हद्दीत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामावरुन महापालिकेवर टीका होत आहे. त्यात शनिवारी सांयकाळी एका व्हिडीओने त्यात आणखीनच भर टाकली आहे. वागळे इस्टेट भागात एका ठिकाणी गटार दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. त्याच्या बाजूला रस्त्याचे कामही सुरु आहे. परंतु पाऊस सुरु असतांनाच एक कंटनेर त्याठिकाणी येतो आणि कंटेनरमधील सिमेंटचे मिश्रण त्या गटारात टाकण्यास सुरवात करतो. आधीच गटारात गुडघाभर पाणी दिसत आहे. त्यातच हे सिमेंट कॉंक्रीट टाकले जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. तेवढ्यात एक दक्ष नागरीक याचे व्हिडीओ शुट करतो. त्याला जाब विचारत मुख्यमंत्र्यांना उद्देशून आवाहनही हा नागरिक करताना दिसत आहे.
शनिवारी सांयकाळपासून हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान वायरल झाला आहे. अखेर सोमवारी महापालिकेलाही याची दखल घ्यावी लागली. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून याचे कारण विचारले आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांनी पावसात कोणतेही काम करु नये, असे सांगितले असतांनाही अशा पध्दतीने काम सुरु असल्याचे दिसून आल्याने त्यांनी देखील संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे यात ठेकेदाराची चुक नसून त्याच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या साईटवरील शिल्लक मटेरीअल त्याठिकाणी टाकले असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. एकप्रकारे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.