टीडीआरएफचे जवान मदतीसाठी तैनात
शहापूर : किसान सभेचा लॉंग मार्च मुंबई-नाशिक महामार्गालगत वाशिंद येथे मुक्कामी असून आज दिवसभर त्यांचा मुक्काम येथील ईदगाह मैदानावरच असणार आहे. रात्री पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्चेकऱ्यांची तारांबळ उडाली, परंतु शासनाने बाजूला असलेल्या इमारतीमध्ये काही मोर्चेकऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. रात्रीपासून टीडीआरएफचे जवान देखील मदतीसाठी तैनात केले असून त्यांनी तंबुंची उभारणी करून निवाऱ्याची व्यवस्था केली.
काल झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झाली असून त्याबाबत आज विधानसभेत चर्चा होऊन मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही, याबाबत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत मोर्चेकरी या ठिकाणी थांबणार आहेत, त्यांचे आज समाधान झाले नाही तर तीन दिवस वाशिंद येथे मुक्काम करून पुन्हा सोमवार पासून हे लाल वादळ मुंबईकडे आगेकूच करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचे आदेश महसूल विभागाला दिल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी प्रांत अमित सानप यांनी सर्व यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून कामाला लावली आहे. मोर्चेकरी रविवारपर्यंत वाशिंद येथेच मुक्कामी राहणार असल्याने त्यांना राहण्यासाठी टेंट, ताडपत्री, पाण्याचे टँकर, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, डॉक्टर यांची व्यवस्था केली असून जागा कमी पडल्यास बाजूच्या इमारती आणि कंपनीच्या शेडमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार वळवी यांनी सांगितले. याठिकाणी तहसीलदार अधिक पाटील, नायब तहसीलदार चौधरी आणि डामसे तसेच महसूलचे सर्व कर्मचारी तळ ठोकून आहेत. कायदा-सुव्यवस्था देखील शहापूर पोलिसांनी चोख पाळली असून कोणताही अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये म्हणून सर्व पोलीस यंत्रणा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या नेतृत्वाखाली सज्ज् असून दिवसरात्र काम करत आहे.