* सर्वसामान्य रहिवाशांची घोर फसवणूक
* ठामपाची कळवा पोलीस ठाण्यात तक्रार
ठाणे : ठाणे महापालिकेचे खोटे दस्तावेज बनवून कळवा आणि खारीगाव भागात अनधिकृत इमारती अधिकृत असल्याचे भासवून पाच विकासकांनी सर्वसामान्य नागरिकांची आणि महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार प्रशासनाने कळवा पोलीस ठाण्यात केली आहे.
महानगरपालिकेचे खोटे दस्तावेज बनवून अनधिकृत इमारती या अधिकृत असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांचा घोटाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी कागदोपत्री पुराव्यांसह बाहेर काढला आहे.
याबाबतचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री , ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे सादर केले होते. संजय घाडीगावकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दाखल केलेल्या पुराव्यांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने अहवाल देण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार महापालिकेने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी फिर्याद दिली आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाच्या अंतर्गत महापालिकांचा कारभार येत असतो. खोटे दस्तावेज बनवून घरे विकण्याच्या या घोटाळ्याबाबत महापालिकेने दिलेल्या फिर्यादीवर पोलीस आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. पोलिसांनी योग्य ती भूमिका घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी घाडीगांवकर यांनी केली आहे.
जर या बांधकाम प्रकरणी एमआरटीपीची कारवाई सहायक आयुक्तानी केली. मग संबंधित
अनधिकृत इमारतींचे बांधकाम तोडण्याची पूर्ण कारवाई निर्माणाधिन अवस्थेत असताना त्याच वेळी का केली नाही ? असाही सवाल घाडीगांवकर यांनी उपस्थित केला आहे. ज्या सहायक आयुक्तांच्या कार्यकाळात इमारत उभी केली गेली त्या सहायक आयुक्तावर आणि परिमंडळ उपायुक्तावर निलंबनाची कारवाई अद्याप का केली जात नाही? असा प्रश्नही घाडीगांवकर यांनी उपस्थित केला आहे.