बदलापूर : एका गॅरेजला आग लागून गॅरेजमधील सुमारे १२ वाहने जळून खाक झाल्याची घटना अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावरील कारमेल शाळेजवळ घडली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी गॅरेजचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बुधवारी सकाळी ७.३०च्या सुमारास हा प्रकार घडला. अंबरनाथ-बदलापूर रस्त्यांवर कारमेल शाळेच्या पुढे असलेल्या ऑटो क्राफ्ट या शोरुम कम गॅरेजला अचानक आग लागून धूर पसरू लागला. थोड्याच वेळात गॅरेजमधील सीएनजी वाहनांचे स्फोट होऊन आग पसरली. गॅरेजवरून गेलेली विद्युत वाहिनी देखील आगीच्या झळांनी तुटली. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा काही वेळेसाठी खंडित झाला होता.
रहदारीच्या या रस्त्यावरील वाहतूक काही वेळ एकेरी करण्यात आली होती. आग लागली त्यावेळी अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने त्यांच्या मुलीला याच रस्त्यावर असलेल्या शाळेत सोडण्यासाठी आले होते. आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानुसार अंबरनाथ, बदलापूर व अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर तीन अग्निशमन वाहने व दोन खाजगी टँकरच्या सहाय्याने ही आग पुर्णतः आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. गॅरेजजवळ असलेल्या टाईल्स व पीव्हीसी टँक शोरुमपर्यंत आग पसरण्याचा धोका होता. परंतु अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहचून आग विझवल्याने हे नुकसान टळले असल्याचे सोनोने यांनी सांगितले. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.