प्रसूतीनंतर दुस-याच दिवशी मातेच्या हाती बाळाचे आधारकार्ड

८६५ कार्ड देणारे शिवाजी महाराज रुग्णालय महाराष्ट्रात सर्वप्रथम

ठाणे : नवजात, तान्ह्या बाळाच्या जन्माच्या दुस-याच दिवशी ‘बाल आधार कार्ड’ जारी करण्याची सुविधा कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने सुरु केली आहे. 12 डिसेंबर 2022 पासून जारी केलेल्या या सेवेचा लाभ तब्बल 865 बाळांना झाला आहे. ही सेवा देणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय महाराष्ट्रातील सर्वप्रथम आहे.

बाळाचा, बेबीचा जन्म झाल्या-झाल्या त्यांना अत्यंत महत्वाच्या तीन व्हॅक्सिन्स (टीका) देणे बंधनकारक आहे. आता त्यासह ‘बाल आधार’कार्डसाठी दररोज नोंदणी केली जाते. या ‘बाल आधार’कार्डची मुदत वयाच्या पाच वर्षांपर्यंतच आहे. त्यानंतर संबंधितांना नियमित आधारकार्ड मिळते.
‘आधार’ ही  भारतातील सर्वात मोठी बायोमेट्रिक व्यक्तीपरिचय योजना आहे. योजनेचे नियंत्रण केंंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. आधार कायदा 2016 अनुसार या योजनेला वैधानिक पाठबळ प्राप्त आहे. ब-याच शासकीय, निम- शासकीय अधिकारी, निम शासकीय कर्मचा-यांकरीता आणि अन्य कामांसाठी, रेशन, बँका, शाळेत/ महाविद्यालये, मोबाईल सेवांकरीता आधार संलग्न करण्यास आग्रह धरले जात आहे.

‘युुआयडीएआय’च्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलच्या उपसंचालिका रुक्मिणी रामचंद्रन काही कामानिमित्त ठाणे येथे आल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकारचा ‘आधारकार्ड’ उपक्रम नवजात बाळांसाठी करता येईल का, याविषयी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर्स, ‘प्रिव्हेंंटीव्ह सोशल मेडिसिन’च्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा जाधव आदींची चर्चा झाली होती. चर्चेअंती ‘बाल आधार’कार्ड सुविधा सुरु करण्याचा निर्णय त्वरीत झाला. त्यामुळे ही सुविधा देणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय महाराष्ट्रात सर्वप्रथम ठरले आहे.

ही सुविधा सुरु होण्याकरीता कळवा-ठाणे येथील ‘राजीव गांधी मेडिकल कॉलेज’चे अधिष्ठाता आणि ठाणे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी (एमओएच) डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय उप अधिक्षक डॉ. राजेश आढाव, ‘प्रिव्हेंंटीव्ह सोशल मेडिसिन’च्या सहाय्यक प्राध्यापक / प्रभारी उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रज्ञा जाधव, बालरोग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक / प्रभारी उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. जयेश पनोत आणि भावेश जाधव (समन्वयक) यांनी अथक प्रयत्न केल्यामुळे या रुग्णालयाचे नाव वैद्यकीय क्षेत्रात कायमचे कोरले गेले आहे.