महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात

अमित शहांनी दिले लक्ष्य

कोल्हापूर: येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व लोकसभेच्या ४८ जागा भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या निवडून द्या आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करा, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शाह यांनी केले.
भाजपच्या विजय संकल्प यात्रा सभेमध्ये ते बोलत होते. २००४ ते २०१४ या काळातील भारतातील परिस्थिती विशद करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चौफेर कामांचा आढावा यावेळी शाह यांनी घेतला. कोणत्याही परिस्थितीत अधिकाधिक खासदार निवडून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपबरोबर युती करून शिवसेना सडली असे म्हणणाऱ्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने अडीच वर्षातच संपून रस्त्यावर आणले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, सुरेश हळवणकर यांची भाषणे झाली.
“२०१९ मध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींचा मोठा फोटो लावला होता. तर उद्धव ठाकरे यांचा लहान फोटो लावला होता. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत, असं तेही अनेकदा बोलले होते. मी आणि मोदींनीही अनेक ठिकाणी हेच बोललो होतो. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या (उद्धव ठाकरे) तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी आपल्या सर्व सिद्धांतांना मूठमाती देऊन ते शरद पवारांच्या चरणाजवळ जाऊन बसले,” अशा शब्दांत शाह यांनी हल्लाबोल केला.
अमित शाह पुढे म्हणाले, “भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आमचाच बनायला हवा होता. आम्हाला सत्तेचा लोभ नाही. आम्ही सत्तेसाठी सिद्धांतांचा बळी दिला नाही. उद्धव ठाकरेंमुळे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी शरद पवारांच्या पायात जाऊन बसली होती. पण आता काळ बदलला आहे. खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपाबरोबर आली आहे. आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आज त्यांना (उद्धव ठाकरे) धडा शिकवण्याचं कामही झालं.”