ठाणे : गुरुवारी सकाळी चरई येथील गुरूप्रेरणा या इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेल्या जिन्याखालील मीटर बॉक्स रूममध्ये आग लागली. ही आग चौथ्या मजल्यापर्यंत गेली होती. त्यामुळे इमारतीत काही रहिवाशी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या 13 रहिवाशांची सुखरूप सुटका केली.
ठाण्यातील चरई येथे गुरुप्रेरणा ही चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर दुकान असून पहिल्या मजल्यावर गोडाऊन आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवाशी राहतात. गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या जिन्याखालील मीटर बॉक्स रूममध्ये आग लागली. काही वेळात आग इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत गेली. त्यामुळे काही रहिवासी इमारतीत अडकले होते.
परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलास दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथक, नौपाडा पोलीस, महावितरण पथक यांनी धाव घेतली. तीन फायर वाहन, एक रेस्क्यू वाहन, एक वॉटर टँकर, एक जंबो वॉटर टँकर आणि एक टीटीएल मशीनसह अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने इमारतीच्या बाहेरच्या बाजूने अग्निशमन दलाच्या लॅडरच्या साह्याने इमारतीमध्ये प्रवेश करून इमारतीमधील रहिवाशांची सुखरूप सुटका केली. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.