परिवहन उपक्रमाचा आज अर्थसंकल्प
ठाणे : महापालिका परिवहन उपक्रमाचा यंदाच्या वर्षीचा म्हणजेच २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी प्रशासनाकडून परिवहन समितीच्या सभेत सादर करण्यात येणार असून त्यात केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या तसेच परिवहनच्या निधीतून पर्यावरणपुरक वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्यावर भर देण्यात येणार आला आहे. याशिवाय, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या धर्तीवर ठाणे परिवहन उपक्रमातील वीजेवरील बसगाड्यांचे तिकीट दर निश्चित करण्याचेही प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मागील वर्षी २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ६२० कोटी ९० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात परिवहन प्रशासनाने महापालिकेकडे तब्बल ४६० कोटी ५४ लाखांच्या अनुदानाची मागणी केली होती. करोना काळात परिवहन उपकमाची बससेवा ठप्प असल्यामुळे या उपक्रमाच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्यातूनच इतक्या मोठ्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. केंद्र शासनाकडून स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत मिळालेल्या निधीतून ८० वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी ११ बसगाड्या परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झाल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातही अशाचप्रकारची घोषणा करण्यात येणार आहे.
वीजेवरील ३०३ बसगाड्या खरेदी करण्यात येणार असून या बसगाड्या केंद्र शासनाकडून स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या निधीतून २०२६ सालापर्यंत टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय, परिवहन उपक्रमाच्या निधीतूनही अशा बसगाड्या खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात येणार आहे. याशिवाय, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या धर्तीवर ठाणे परिवहन उपक्रमातील वीजेवरील बसगाड्यांचे तिकीट दर निश्चित करण्याचेही प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.