भेळवाल्यांच्या पुनर्वसनाला स्थानिक रहिवाशांचा विरोध
ठाणे: तलावपाळीलगत खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा घाट महात्मा गांधी उद्यानालगत महापालिकेने घातला असून यामुळे परिसराची शांतता धोक्यात येणार असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा नागरीकांनी दिला आहे.
ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या तलावपाळी परिसरात अनेक भेळपुरी, पाणीपुरी आदी खाद्यपदार्थ विक्रेते हातगाड्यांवर व्यवसाय करत असून या विक्रेत्यांकडून खरकटे आणि कचरा तलावात टाकला जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. तर टाकलेले पदार्थ साचून दुर्गंधी पसरून डासांची पैदासही होत होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार या विक्रेत्यांना हटवण्यात आले होते. या विक्रेत्यांचे पुनर्वसन येथील महात्मा गांधी उद्यानालगत करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. याबाबत स्थळपाहणीही करण्यात आली होती.
या नवीन खाऊगल्लीमुळे परिसराची शांतता धोक्यात येणार असल्याची भीती येतबील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. या ठिकाणी विक्रेते आणि नागरिकांचा वावर रात्री उशिरापर्यंत असणार आहे, त्यामुळे स्थानिकांची चिंता वाढणार असल्याचे मतही जागरूक नागरीक व्यक्त करत आहेत. या ठिकाणी कर्णबधिर विद्यालय आहे, त्यांनाही फेरीवाल्यांचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येथील राज हॉल, मोती बाजार बिल्डिंग, रुक्मिणी वामन बिल्डिंग, ब्राम्हण सभा, गुरू छाया बिल्डिंग, भरत भवन बिल्डिंग येथील रहिवाशांचा महापालिकेच्या प्रस्तावाला विरोध असून त्यांनी आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, भाजपा नगरसेवक संजय वाघुले यांना निवेदन दिले आहे.