नवी मुंबई महापालिकेला ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड

नवी मुंबई : सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहराने गुणात्मक नागरी सुविधा व अत्याधुनिक प्रकल्पांमुळेही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नागरी विकासातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस नुकताच ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून ग्रेटर नोएडा येथील विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान स्विकारला. मनपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायन्स पार्क, सेंट्रल लायब्ररी, एनएमएमटी उपक्रमाची वाशी येथील बहुउपयोगी आकर्षक इमारत यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारले जात असून यापूर्वीच्या लौकीकात लक्षणीय भर टाकली जात आहे.