अडीच लाखांच्या दरोड्यातील तीन गुन्हेगारांना अटक

कंपनीतील कर्मचा-यानेच दिली होती टीप

ठाणे : शस्त्रांचा धाक दाखवून नाशिक-मुंबई महामार्गावर केलेल्या अडीच लाख रुपयांच्या दरोड्यातील तीन गुन्हेगारांना उत्तर प्रदेशातून शस्त्रांसह अटक करण्याची कामगिरी कळवा पोलिसांनी बजावली आहे.

दररोजची जमा होणारी बक्कळ रक्कम कंपनीतील कर्मचा-यातर्फे बँकेत जमा करण्यात येत असते, अशी टीप आतल्या व्यक्तीने दिल्यानंतर दरोडा टाकण्याचा बेत शिजला. मात्र कळवा पोलिसांनी पराकाष्ठा करुन त्यांना पकडून गजाआड केले.

या गुन्हेगारांची नाशिक ते मुंबई महामार्गावर काळोखात, निर्जन रस्त्यांवर दरोडा टाकण्याची ‘मोडस् आॅपरेंडी’ असल्यामुळे वाहन चालकांना लुटता येत असे आणि चालकदेखील त्यांना विरोध करु शकत नसल्यामुळे ते लगेच फरार होत होते. हा गुन्हा करताना त्यांनी लोखंडी धातुच्या एअर पिस्टलचा धाक दाखवला आणि त्यातून झाडलेल्या गोळीचा आवाज येऊ नये याचीही सतर्कता घेत होते. यावेळीही लुटमार केल्यानंतर आॅनलाईन ओएलएक्स अ‍ॅपवरुन ट्रिगर  कार बोलावून फरार झाले.

या गुन्ह्यात एकूण पाच गुन्हेगार असून त्यात १७ वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. बालकाच्या सहाय्याने अन्य पाचव्या आरोपीचा लवकरच माग काढण्यात येईल, अशी माहिती कळवा विभागाचे सहाय्यक आयुक्त विलास शिंदे आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिली. आरोपींनी पोलिसांकडे गुन्हयाची कबूली दिली असून, जबरीने चोरी केलेल्या रकमेतून ६३ हजार ५०० रुपये आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिका-यांसह सर्व हवालदार रमेश पाटील, माधव दराडे, शहाजी एडके, श्रीमत राठोड, पोलीस नाईक सैय्यद तौफिक, राहुल पवार, शिपाई ढावरे, तांत्रिक मदतनीस अंमलदार माळी यांनी ही कामगिरी केली आहे.

१६ जानेवारी  २३ रोजी खारेगाव टोलनाक्यावरुन काही अज्ञात व्यक्तींनी तक्रारदाराची दुचाकी अडवली आणि त्यांच्याकडे असलेली पैशाची बॅग हिसकावली आणि तीन मोबाईल जबरीने चोरुन पळून गेले. अपराध करतेवेळी आरोपींनी १७ जानेवारी २३ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यात पाचजणांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्यावर दरोड्याचे कलम लावण्यात आले. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तो उघडकीस आणण्यासाठी  कन्हैय्या थोरात यांनी निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक दीपक घुगे व त्यांच्या सहका-यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले.

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयितांचा माग काढला. आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी त्यांचे अस्तित्व लपवून नाशिकमार्गे गुजराथ, मध्यप्रदेश असा प्रवास केला. त्यांनी रेल्वेमार्गे तपास केल्याची माहिती मिळाली, तेव्हा  ते उत्तर प्रदेशातील जिल्हा बस्ती येथे पळून गेल्याचे कळताच आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वपोनी थोरात यांनी उपनिरीक्षक घुगे व त्यांच्या सहका-यांचे पथक उत्तर प्रदेशात पाठवले. हे पथक ‘युपी’मध्ये पोहचल्यानंतर त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले. बस्तीतून चार आरोपींना शिताफिने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एक १७ वर्षांचा बालक होता. तपासात त्यांना पाचव्या आरोपीनेही अपराध  केला असल्याची माहिती मिळाली.