टीएमटी बसगाड्यांमधील आग प्रतिबंधक यंत्रणा कालबाह्य

ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांमधील आग प्रतिबंधक यंत्रणा कालबाह्य झाली असून दोन दिवसांपूर्वी आगीत जळून बस खाक झाल्याच्या घटनेला प्रशासनाच जबाबदार असल्याचा आरोप परिवहन समितीच्या सदस्याने केला आहे.

दोन दिवसांपूर्वी ठाणे परिवहन सेवेच्या लोकमान्य बस टर्मिनलजवळ वृदांवन मार्गावर उभ्या असलेल्या बसला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी कुठलेही साधन बसमध्ये उपलब्ध नसल्याचे आता उघडकीस आले आहे. आरटीओच्या नियमानुसार प्रत्येक बसमध्ये आग प्रतिरोधक उपकरण असणे बंधनकारक आहे. टीएमटीच्या काही बसेसमध्ये अशी उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र या उपकरणांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आल्याचा दावा परिवहन सदस्य मोहसीन शेख यांनी केला आहे.

परिवहन व्यवस्थापकांना २१ डिसेंबरला याबाबत पत्र दिले होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि लगेचच काही दिवसांमध्ये ही दुर्घटना घडली. नशीबाने त्यावेळी जिवीतहानी झाली नाही. मात्र मोठी दुर्घटना झाली असती तर त्याला जबाबदार कोणाला धरले असते असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे.

जीसीसी तत्वावरील बसेसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे बसवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे, की पालिका प्रशासनाची असा सवाल परिवहन सदस्य मोहसीन शेख यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर आठ दिवसांत कारवाई केली नाही तसेच बसेसमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वागळे आगार आणि परिवहन समितीच्या सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेख यांनी दिला आहे.