भरतीपूर्वीच ‘अंमल’दार?

स्टॅमिना वाढवणारी औषधे घेणाऱ्या उमेदवारांवर लक्ष

ठाणे: स्टेरॉईड तसेच अंमली पदार्थाचे सेवन करून पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांवर पोलिसांचे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. ठाण्यातील औषध विक्रेत्यांनी क्षणिक स्टॅमिना वाढविणारी औषधांची विक्री करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तलयात सुमारे ५०० पोलिसांची भरती होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान भरतीकरिता आलेले काही उमेदवार स्टॅमिना वाढविण्यासाठी अंमली पदार्थ, स्टेरॉईड इंजेक्शन आणि औषधांचे सेवन करून शारीरिक चाचणीची परीक्षा देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्या दालनात शहरातील औषध विक्रेता संघाच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी स्टॅमिना वाढविणारी औषधे, इंजेक्शन आणि गोळ्यांची विक्री करू नये, असे प्रकार आढळून आले तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले.

असे प्रकार टाळण्यासाठी विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. असा प्रकार आढळला तर त्या उमेदवारांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत ठाणे केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की अशा प्रकारची औषधे घेतली तर फक्त १५ ते २० मिनिटे त्याचा परिणाम राहतो, परंतु शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. ठाण्यातील औषध विक्रेते अशा प्रकारची औषधे विकत नाहीत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला विलास जोशी, सचिव सुरेश भट्ट, खजिनदार रमेश चौधरी, उपाध्यक्ष खेतराम चौधरी, राजेश राजपुरोहित, बाळू शेठ, अन्न आणि औषध निरीक्षक श्री. खोपकर आणि श्री. केदारे उपस्थित होते.