विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव

नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात राजकारण चांगलेच तापले आहे. आता महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवले आहे. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिले आहे.

सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हे पत्र दिले आहे, ज्यावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या सह्या आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांना सभागृहात बोलून दिले जात नसल्याने मविआने हे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.

याच नाराजीतून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस विधिमंडळ सचिवांना देण्यात आलेली आहे.