* आठ महिने लग्नाचे मुहूर्तच मुहूर्त
* ब्ल्यू मून आणि सुपर मूनचे योग
ठाणे : येणारे २०२३ हे वर्ष विवाहेच्छूकांसाठी आनंदाचे असून तब्बल आठ महिन्यांत लग्नाचे मुहूर्त आहेत तर सोने खरेदीसाठी एक-दोन नव्हे तर चार गुरू पुष्य योग असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
यावर्षी सन २०२२ मध्ये ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता लीप सेकंद पाळला जाणार नाही. त्यामुळे शनिवार ३१ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्री ठीक १२ वाजता नूतन वर्ष सन २०२३ चा प्रारंभ होणार आहे. सन २०२३ हे लीपवर्ष नसल्याने फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्षाचे दिवस ३६५ असणार आहेत. सन २०२३ मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. कारण २४ पैकी तीन सुट्ट्या शनिवारी आणि दोन सुट्ट्या रविवारी येणार आहेत. महाशिवरात्र १८ फेब्रुवारी, रमझान ईद २२ एप्रिल आणि मोहरम २९ जुलै हे दिवस शनिवारी आणि छ. श्रीशिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी आणि दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर हे दिवस रविवारी येणार आहेत. सन २०२३ मध्ये १८ जुलै ते १६ ॲागस्ट २०२३ अधिक श्रावण महिना येणार आहे. त्यामुळे नागपंचमी पासून सर्व सण साधारण १९ दिवस उशीरा येणार आहेत.
विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जुलै, ॲागस्ट, सप्टेंबर, ॲाक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सन २०२३ मध्ये श्रीगणेश चतुर्थी मंगळवार १९ सप्टेंबरला आली असल्याने यावर्षी गणेश चतुर्थीला ‘अंगारक योग‘ आलेला आहे. या नूतन वर्षी मंगळवार १० जानेवारी रोजी एकच ‘अंगारकी संकष्ट चतुर्थी‘ आहे.
सोने खरेदी करणारांसाठी सन २०२३ या नूतन वर्षामध्ये एकूण चार गुरुपुष्य योग आले आहेत. ३० मार्च, २७ एप्रिल, २५ मे आणि २८ डिसेंबर रोजी गुरुपुष्य योग असणार आहेत.
सन २०२३ मध्ये २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी २० एप्रिल आणि १४ ॲाक्टोबरची दोन्ही सूर्यग्रहणे भारतातून दिसणार नाहीत मात्र ५ मे चे छायाकल्प चंद्रग्रहण आणि २८ ॲाक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण ही दोन्ही चंद्रग्रहणे भारतातून दिसणार आहेत. एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणतात. सन २०२३ मध्ये १ ॲागस्ट आणि ३१ ॲागस्ट रोजी पौर्णिमा आल्याने ३१ ॲागस्ट रोजी ‘ब्ल्यू मून‘ योग आला आहे.
पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला असेल तर ‘सुपरमून‘ योग असतो. त्या दिवशी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. सन २०२३ मध्ये १ ॲागस्ट आणि ३१ ॲागस्ट असे दोन ‘सुपरमून योग‘ येणार आहेत.
सन २०२३ मध्ये तिथीप्रमाणे शुक्रवार २ जून रोजी आणि तारखे प्रमाणे मंगळवार ६ जून रोजी शिवराज शक ३५० सुरू होणार आहे. सन २०२३ मध्ये रविवार १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन एकाच दिवशी येणार आहे. बलिप्रतिपदा ंमंगळवार १४ नोव्हेंबर रोजी आणि भाऊबीज बुधवार १५ नोव्हेंबर रोजी आहे असल्याची माहिती सोमण यांनी दिली.