* साध्या वेशातील पोलीस तैनात
* सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
ठाणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर साध्या वेषातील पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे तर मद्य प्राशन करून गाडी चालविणाऱ्यांच्याही विरोधात ठाणे पोलिस कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सरत्या वर्षाला आणि १ जानेवारी रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी ठाणेकर एकत्रित येऊन जल्लोष करतात. अशा ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. त्या करिता ठाणे पोलिस सज्ज झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि साध्या वेषातील ७० पोलीस हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवणार आहेत.
ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, आणि वागळे या हद्दीत ५०० अधिकारी आणि तीन हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहर वाहतूक पोलीस विभागाचे ४२ अधिकारी आणि ४०० पोलीस शिपाई महत्त्वाच्या चौकात दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीतील गर्दीची ठिकाणे, हुक्का पार्लर पब, हॉटेल, लॉज,येथे सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत.
महिलांच्या छेडछाडीचे प्रकार थांबविण्यासाठी निर्भया पथकाची स्थापन करण्यात आली असून साध्या वेषातील पोलीस गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. खाडी किनारी जेट्टी लँडिंग ठिकाणीही गस्त वाढविण्यात येणार आहे.
ठाणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करताना न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी लावावी, असे आवाहन पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.