रस्ता रुंदीकरणाचा उडाला फज्जा
सुरेश सोंडकर/ठाणे
ठाणे : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या कठोर भूमिकेतून शहरात रस्त्यांचे रुंदीकरण झाले, मात्र अतिक्रमण आणि फेरीवाल्यांमुळे रुंदीकरणाचा फज्जा उडालाच शिवाय पदपथही गायब झाले. जांभळी नाका बाजारपेठ ते अशोक सिनेमापर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा असलेले पदपथही जणू भाड्याने दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील लहान-सहान व्यापारी आणि गोर गरिबांसह सधनांचा वावर असलेल्या ठाणे शहरातील जांभळी नाका बाजारपेठेतील रस्ता आणि दुतर्फा असलेल्या पदपथांचा अतिक्रमण आणि फेरीवाल्यांनी ताबा घेतल्याचे दिसत आहे. या रस्त्यावरून महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्या आणि दुचाकी वाहनांची वर्दळ असते, तर फेरीवाल्यांची दुतर्फा झुंबड उडालेली असते. यातून मार्ग काढताना नागारिकांना जीव मुठीत घ्यावा लागतो. परिणामी लहान-सहान अपघात आणि भांडणे रोज पाहायला मिळतात. मग रस्ता रुंदीकरणाचा फायदा नक्की कोणाला झाला? असा प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत.
या रस्त्याच्या दुतर्फा शेकडो दुकाने आणि भव्य शोरूम आहेत. त्या लगतच असलेल्या पदपथांवर कपडे, कटलरी आणि अन्य साहित्य विकणाऱ्या फेरीवाल्यांनी पाय पसरले आहेत, त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पदपथाच्या वापरापासून ठाणेकर वंचित राहिले आहेत.
पदपथ झाले उत्पन्नाचे साधन?
पदपथ मोकळे करण्यासाठी जागर फाऊंडेशन या संस्थेने नौपाडा प्रभाग समितीकडे पाठपुरावा केल्यानंतर एक दिवस कारवाई झाली पण पुन्हा हे पदपथ अनधिकृत व्यवसायिकांनी गिळंकृत केले. दुकानांसमोरील पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या या शेकडो व्यावसायिकांकडून दररोज भाडे कोणाला मिळते? किती मिळते? पालिका प्रशासनाकडून यांच्याविरोधात ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई का होत नाही? असे संशय निर्माण करणारे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
वाहतूक शाखेची सापत्न कारवाई?
वाहनतळांची व्यवस्था अपुरी असल्याने जांभळी नाका बाजारपेठेच्या रस्त्यावर ग्राहक दुतर्फा दुचाकी वाहने उभी करतात. यातील काही वाहने वाहतूक शाखा उचलून नेते, परंतु दुकानासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली जात नाही, यामुळे वाहतूक शाखेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे, अशी तक्रार एका वाहन चालकाने केली आहे. वाहतूक शाखा सापत्न भावाने कारवाई करत असल्याने वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी त्यात आणखी भर पडते, असा आरोप नागरिक करत आहेत.