बंद कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज करण्याचे निर्देश

कोव्हीडविरोधात मीरा-भाईंदर पालिकेची तयारी सुरू

भाईंदर: जागतिक स्तरावर खास करून पूर्व अशियामध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने खबरदारीची बाब म्हणून मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने यांनी वैद्यकीय अधिकारी आणि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोव्हीड चाचणी त्वरित करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
परदेशात कोरोनाचा वाढता धोका पाहता मीरा-भाईंदर शहरातील सर्व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या परिसरात जनजागृती करण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याकरिता सुचना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मागील काही काळापासून कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याने मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत बहुसंख्य कोव्हिड सेंटर हे बंद ठेवण्यात आले होते. त्यातील काही कोव्हिड सेंटर हे पुन्हा सुसज्ज करून सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोव्हिड बूस्टर डोस तसेच १८ वर्षांवरील नागरीकांकरिता लसीचे दोन्ही डोस पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहरातील सर्व नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे, सामाजिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी व शासकीय तसेच खाजगी केंद्रांवर सुरू असलेल्या ठिकाणी बूस्टर डोस घेऊन स्वतःला पूर्ण संरक्षित करावे. शहरात कोव्हिडबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण न करता मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.