बदलापूरातील ग्रामीण भागात गव्याचे दर्शन

बदलापूर : बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या बेेडशीळ आणि चिकण्याची वाडी परिसरात एका गव्याचे दर्शन झाले आहे. यापूर्वीही मुरबाड तालुक्यात आणि बारवीच्या परिसरात गव्याचे दर्शन झाले होते. सह्याद्रीच्या डोंगररांगामधून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एका बाजूला उल्हास खोरे, बारवी धरण, अनेक नैसर्गिक प्रवाह आणि दुसरीकडे मलंगगड, टाहुली ते थेट माथेरानची डोंगररांग यामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ही वेस निसर्गसंपन्न आहे. त्यामुळे या भागात अनेक दुर्मिळ वन्यजीवांसह अनेक प्राण्यांचा वावर आढळतो. गेल्या काही वर्षात या भागात बिबट्याचा मुक्त संचार पहायला मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी बारवी धरण क्षेत्रात गवा आढळल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हा गवा वर्षभरापूर्वी पुन्हा मुरबाड तालुक्यातील आणि शहापूर तालुक्याच्या वेशीवर असलेल्या चिखले गावाजवळ आढळून आला होता. आता पुन्हा हा गवा अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराजवळ असलेल्या बेंडशीळ आणि चिकण्याची वाडी परिसरात पाहिला गेला आहे. वन विभागातर्फे या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. अनेकदा हे गवे कळपाने एकत्र येतात आणि मग वेगळे होत असतात. त्यातील हा गवा वाट चुकून आल्याची शक्यताही व्यक्त केली जाते आहे.

बलदंड आणि पळदार शरीर असलेला गवा हा शक्तीशाली दिसणारा प्राणी लाजाळू असतो. अर्धचंद्राकार शिंग असलेला हा गवा शुद्ध शाकाहारी आहे. हा गवा भारतातील दोन खुऱ्यांच्या जनावरांपैकी एक आहे. कळपाने फिरणारा हा गवा अनेकदा वेगळा होऊनही आपला प्रवास करत असतो.